
सामना ऑनलाईन । मुंबई
अशोक संपत हे पत्नी तसेच मुली निधी, खुशी यांच्यासह परळमध्ये राहत होते. मात्र क्रिस्टल टॉवरमधील आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अशोक संपत यांचा मृतदेह ओळखणेही शक्य होत नव्हते. त्यांची मुलगी निधी आणि पत्नी यांना बोलावून खात्री करून घेतली जात होती. मात्र हे माझे पप्पा नाहीत हेच निधी वारंवार सांगत होती. तिने फोडलेल्या टाहोमुळे तिथे उपस्थितांचे काळीजही हेलावले. पूर्णतः जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची डीएनए चाचणी करावी लागणार होती. तशातच पोलिसांनी अधिक तपासणी केली असता मृतदेहाच्या कपड्यांमध्ये जळालेल्या स्थितीतील व्हिजिटिंग कार्डस् सापडली. यावरून त्यांची ओळख पटल्याचे त्यांचे मित्र ज्ञानेश तांडेल यांनी सांगितले.
साजीव नायर हे वसईत राहणारे होते. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे साजीव यांचा हिंदमाता येथे मेडिकल इन्स्टमेंट रिपेअरचा व्यवसाय होता. त्यांच्यासोबत काम करणार्या कामगारांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. साजीव नायर यांच्या 20 वर्षांच्या मुलाला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले तेव्हा त्याला काहीही माहीत नव्हते. वडिलांना अशा स्थितीत पाहून त्याला मोठा धक्का बसला. साजीव नायर यांना त्यांच्या हातातील घड्याळ आणि गळ्यातील चेनवरून ओळखण्यात आले.





























































