अखेर सुरेश रैनाने मौन सोडले, ‘IPL 2020’ सोडून मायदेशी परतण्याचे खरे कारण सांगितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) मधल्या फळीतील दमदार फलंदाज सुरेश रैना इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) सोडून मायदेशी परतला आहे. रैनाने खासगी कारणामुळे यंदाचा सिझन न खेळण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात होते. मात्र तो नक्की कोणत्या कारणामुळे मायदेशी परतला याचा स्पष्ट खुलासा झाला नव्हता. मात्र आता सीएसकेच्या या विस्फोटक फलंदाजामे यूएईहुन मायदेशी येण्याचे कारण सांगितले आहे.

याआधी आयपीएलचा 13 वा सिझन खेळण्यासाठी यूएईला पोहोचलेल्या सीएसकेच्या संघातील काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. यामुळे रैनाला भीती वाटली आणि यामुळे त्याने मायदेशी परत येण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरू होती. तसेच रैनाचा दुबईत ताज हॉटेलमध्ये जी रूम मिळाली आहे ती कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक प्लेमिंग यांच्यासारखी आलिशान नसल्याने आणि रूमला बाल्कनी नसल्याने त्याने नाराज होऊन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असेही वृत्त आले.

याच दरम्यान सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी देखील एक वक्तव्य करत या प्रकरणाला हवा देण्याचे काम केले. यशाच्या धुंदीत रैना बुडाला असल्याकगे विधान श्रीनिवासन यांनी केले. मात्र पुढच्याच दिवशी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला असेही ते म्हणाले. तसेच रैना मायदेशी परत आल्याने सीएसके त्याला संघातून डच्चू देणार असेही वृत्त आले. मात्र रैनाने ट्विट करत हिंदुस्थानला परत येण्याचे कारण स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

माझ्या कुटुंबाला माझी गरज
पठाणकोट येथे रैनाच्या कुटुंबावर हल्ला झाला. यात रैनाचा काकांचा आणि त्याच्या चुलत भावाचा मृत्यू झाला. अशा काळात कुटुंबाला माझी गरज असल्याने मायदेशी परत आल्याचे रैनाने म्हटले. तसेच ‘क्रीकबझ’शी बोलताना रैना म्हणाला की, सीएसके देखील माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. कुटुंबाला सोडून मायदेशी येण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र माझ्या कुटुंबाला माझी सध्या जास्त गरज असून माझ्यात आणि सीएसके संघात आजही जिवाभावाचे संबंध आहेत, असेही रैना म्हणाला. तसेच कोणताही खेळाडू 12 कोटी 50 लाख रुपयांना पाठ दाखवू शकत नाही. यामागे एक ठोस कारण हवे. मी भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असतो तरी आगामी 4 ते 5 वर्ष सीएसकेकडून खेळत राहील, असेही रैना म्हणाला.