
कोकीळ प्रजातीतील ‘पिजे’ या पक्ष्याने अलीकडेच एक रेकाॅर्ड केलाय. पिजेने पाच वर्षांमध्ये सहारा वाळवंट दहा वेळा पार केलेय. इंग्लंडसारख्या थंड देशात आढळणाऱया या पक्ष्याने सहारा वाळवंटासारख्या उष्ण प्रदेशात प्रवास केल्यामुळे पक्षी अभ्यासक अचंबित झाले आहेत. पिजे पक्ष्याने या काळात 80 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. इंग्लंड ते सहारा वाळवंट आणि परत सहारा वाळवंट ते इंग्लंड असा त्याचा मार्ग होता.
पिजे हा सामान्य ‘कुकुलस कनोरस’ प्रजातीतील पक्षी आहे. थंडीच्या हंगामात ते आफ्रिकेच्या दिशेने स्थलांतर करतात. वसंत ऋतू आला की इंग्लंडला परततात. मे महिन्यापर्यंत घरटं बांधून पिल्लांना जन्म देतात. या लांबच्या प्रवासात पिजे पक्षी अनेक देशांमधून प्रवास करतात.
ब्रिटिश ट्रस्ट फॉर ऑर्निथोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार कुकू-पिजे आता दुर्मीळ होत चालले आहेत. त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून इंग्लंडमध्ये कडक कायदा करण्यात आला आहे. पिजे पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी आहे.





























































