
सार्वजनिक ठिकाणी तसेच उघडय़ावर थुंकणाऱ्या नागरिकांमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येताच मुंबई उच्च न्यायालयाने आज बेजबाबदार नागरिकांच्या कृत्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना काळात थुंकणाऱ्या लोकांकडून दंड आकारण्याबरोबरच त्यांना लगाम घाला, त्यासाठी व्यापक जनजागृती करा असे आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणे बंधनकारक असतानाही त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने अरमीन वांद्रेवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उघडय़ावर थुंकणाऱ्या नागरिकांमुळेच कोरोना वाढत असून अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावर काही जबाबदार नागरिक, बेस्ट वाहक-चालक हे रस्त्यावर बिनबोभाटपणे थुंकत असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर थुंकू नये यासाठी जनजागृती करावी. याची सुरुवात पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांपासून करावी; कारण ते याबाबतीत गंभीर दिसत नाहीत, असे न्यायमूर्ती म्हणाले. एवढेच काय, तर पालिकेच्या वतीने अॅड. रूपाली अधाते यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, पालिका प्रशासन थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम योग्य प्रकारे राबवत असून याचिकाकर्त्यानी सुचवलेल्या सूचनाही अमलात आणल्या जात आहेत. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी जुलैपर्यंत तहकूब केली.

























































