तिरकी नजर- पाठलाग करायला आवडतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश वरवडेकर

हल्ली कुणी इतिहासात रमत नाही. इतिहासात असं घडलं होतं, तसं घडलं होते असं कुणी मानतही नाही. मलाही हे पटू लागलंय. प्रत्येक दिवस नवा असतो आणि प्रत्येक संघ खेळपट्टी आणि वातावरण पाहून निर्णय घेतो. वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरआधी 7 सामने खेळले गेले होते आणि त्यापैकी सहा सामने प्रथम फलंदाजी करत जिंकले होते. केवळ एका सामन्यात आपण धावांचा पाठलाग केला होता. याचा अर्थ असा की, हिंदुस्थानला पाकिस्तानविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करायला आवडते.

पण जेव्हा मोदी स्टेडियमवर नाणेफेक झाली आणि रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तेव्हा छातीत धस्स झालं. कारण पाकिस्तानविरुद्ध पाठलाग करताना नेहमीच आपली घाबरगुंडी उडायची हा इतिहास आहे, पण आता तो इतिहास इतिहासजमा झालाय. रोहितने क्षेत्ररक्षण घेतलं आणि सहजपणे पाकिस्तानी आव्हानाचा पाठलागही केला. वर्ल्ड कपमध्ये सध्या एक वेगळा ट्रेंड सुरू झालाय. आपल्या इथे पाटा खेळपट्टय़ा बनवण्यात आल्यामुळे धावांचा पाठलाग सोप्पा झालाय. त्यामुळे जो संघ टॉस जिंकतोय तो फारसा विचार न करता क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय.

हा निर्णय घेणं सोप्पं नाही. ऑक्टोबर हीटच्या असह्य उन्हात संघ उभं राहणं पसंत करताहेत, थोडासा त्रास सहन करताहेत. कारण त्यांना कल्पना आलीय की, रात्रीच्या प्रकाशझोतात धावांचा पाठलाग करणं फार कठीण राहिलेलं नाही. जेव्हा इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारखे संघही टॉस जिंकून फलंदाजीला न उतरता गोलंदाजीला उतरतात तेव्हाच कळू लागलेय की, धावांचा पाठलाग करणं जास्त सहज आहे.

वर्ल्ड कपच्या गेल्या 14 सामन्यांमध्ये टॉस जिंकलं की, घ्या गोलंदाजी, हेच पाहायला मिळालं आहे. जास्त संघ धावांचा पाठलाग करून जिंकलेत. पण काही संघ धावांचा पाठलागही करू शकलेले नाहीत. 14 पैकी 9 सामन्यांत धावांचा पाठलाग करून संघ जिंकलेत, तर 5 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारे संघ. दहा संघांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं आणि चक्क पाच संघ हरलेत. म्हणजे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करून जिंकणारे आणि हरणारे प्रत्येकी पाच-पाच संघ आहेत. म्हणजे पन्नास टक्के यश.

चौदापैकी दहा संघांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं तर चार संघांनी प्रथम फलंदाजी. इथेही थोडासा गोंधळ उडालाय. ज्या संघांनी प्रथम फलंदाजी घेतली ते चारही संघ हरलेत. यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेतच, पण श्रीलंकेने सलग तिन्ही वेळा टॉस जिंकले आणि ते तिन्ही वेळा हरलेत. त्यांच्यासाठी टॉसची हॅटट्रिक पराभवाचीही हॅटट्रिक ठरलीय. त्यांनी दोनदा फलंदाजी आणि एक वेळ गोलंदाजी घेतली, पण निकाल एकच राहिलाय.

टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेऊन जिंकणारे संघही चारच आहेत. त्यामुळे आकडे आपल्या संभ्रमात टाकू शकतात, पण एक गोष्ट अगदी खरी आहे, ती म्हणजे धावांचा पाठलाग करणं संघांना आवडू लागलंय. हिंदुस्थानने तिन्ही सामने धावांचा पाठलाग करून जिंकलेत. रोहित फक्त एकदाच टॉस जिंकला, पण सामने मात्र तिन्ही जिंकला. म्हणजेच टॉस जिंकण्यापेक्षा धावांचा पाठलाग करणं संघांना जास्त सोयिस्कर ठरलंय. पुढेही हा ट्रेंड कायम राहिला तर आश्चर्य वाटणार नाही. कारण ऑक्टोबर हीटमध्ये हा महिना वर्ल्ड कपला होरपळून काढणार आहे. फक्त या वातावरणाची सवय असणारे आशियाई संघ किती फायदा घेतात हे महत्त्वाचे आहे.