नोकरीचे प्रलोभन दाखवत उच्चशिक्षित तरुणीला 33 हजारांचा गंडा

नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्याने एका उच्चशिक्षीत तरुणीला 33 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी चैत्राली सुरेश पवार (वय 25, रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्राली उच्चशिक्षित असून त्यांना चांगल्या आयटी कंपनीत नोकरी हवी होती. त्यासाठी त्या ऑनलाईन वेबसाईटवर नोकरी शोधत होत्या. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधून एका नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखविले. संबंधित कंपनीत एचआर विभागात नोकरी असल्याचे सांगत त्यांनी चैत्रालीला पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार चैत्रालीने सायबर चोरट्याने सांगितलेल्या बँक खात्यात 33 हजार 340 रुपये पाठविले. रक्कम पाठवूनही नोकरी न लागल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर चैत्रालीने कोथरुड पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली.

क्रेडिट कार्डची माहिती देण्याच्या बहाण्याने गंडा
क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक देण्याच्या बहाण्याने साबयर चोरट्याने एका महिलेची 61 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रादार महिलेचे एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असून त्यांनी कार्डचा वापर केला नाही. त्यासंदर्भात क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक देतो म्हणून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे त्याने 61 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या