आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदतीसाठी मुंबईत 20 सायकल ऍम्ब्युलन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी सुरू केलेली बाईक ऍम्ब्युलन्सची योजना यशस्वी झाल्यानंतर आता सायकल ऍम्ब्युलन्स सुरू होणार आहे. सुरुवातीला ही योजना सुरू करण्यासाठी शिवाजी पार्क, विलेपार्ले, अंधेरीत 20 सायकल ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यास राज्याच्या आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. मुंबईतल्या चिंचोळय़ा गल्ल्यांमध्ये शिरून रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार देण्यासाठी या सायकल ऍम्ब्युलन्सचा उपयोग होईल.

मुंबईत, खास करून दक्षिण मुंबईच्या अनेक भागांत चिंचोळय़ा गल्ल्या आहेत. तसेच मुंबईत सध्या अनेक ठिकाणी वाहतूककोंडी असते. त्यामुळे ऍम्ब्युलन्स अनेकदा वेळेत मदतीसाठी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाने ‘बाईक ऍम्ब्युलन्स’ योजना सुरू केली. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले. ही योजना रुग्णांसाठी फायदेशीर ठरल्याचे लक्षात आल्याने आरोग्य विभागाने सायकल रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. सायकल रुग्णवाहिकेवर नियुक्त केल्या जाणाऱया निमवैद्यकीय व्यक्तीकडे स्वतःचा मोबाईल असेल आणि तो क्रमांक 108 या ऍम्ब्युलन्स सेवेशी जोडण्यात येईल. सायकल ऍम्ब्युलन्सची योजना सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

वेळ पडल्यास रुग्णालयात
वैद्यकीय मदतीसाठी 108 क्रमांकावर कॉल आल्यास संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन प्राथमिक उपचार करण्यात येतील. सायकल रुग्णवाहिकेत वयोवृद्ध रुग्णांसाठी किमान आवश्यक असणारी औषधे तसेच उपकरणे ठेवली जातील. गंभीर स्वरूपाचा आजार असल्यास 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला नजीकच्या मोठय़ा रुग्णालयात दाखल केले जाईल.

औषधांपासून जीपीएस यंत्रणा
सायकल रुग्णवाहिकेवर बसविण्यात येणाऱया पेटीत औषधांसह स्टेथोस्कोप, रक्तदाब तपासणी उपकरण, ग्लुकोमीटर, थर्मामीटर, सीरिंज, कॉटन बँडेज आदी उपकरणे असतील. सायकल रुग्णवाहिकेची किंमत, जीपीएस यंत्रणा, वैद्यकीय उपकरणे, सायकलची देखभाल-दुरुस्ती तसेच औषध, निमवैद्यकीय कर्मचारी या योजनेवर दरवर्षाला 33 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.