Biparjoy ची तीव्रता वाढली! गुजरातपासून पाकिस्तानपर्यंत हाय अलर्ट; 15 जूनला किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. आता या वादळाची तीव्रता वाढली असून त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसत आहे. या ठिकाणी समुद्रात उंच लाटा उशळत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कच्छच्या मांडवीपासून कराची दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्याला हे वादळ 15 जूनच्या दुपारी धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

या वादळाची तीव्रता वाढल्याने गुजरातपासून पाकिस्तानपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनच्या सकाळी हे वादळ ईशान्येकडे सरकणार आहे. सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडत 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जखाऊ बंदर, मांडवी आणि पाकिस्तानातील कराचीदरम्यानच्या किनारीभागाला वादळ धडकण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग 125 ते 135 किमी प्रतीतास राहणार असून तो 150 किमीप्रतीतासापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बिपरजॉय चक्रीदाळाचा सर्वाधिक तडाखा 15 जूनला बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वादळ धडकण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही हवामान खात्याने दिल्या आहेत. चक्रवादळ आणि वादळी वाऱ्यांच्या तडाख्याने वृक्ष,वीजेचे खांब आणि मोबाईल टॉवर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. तसेच या वादळाचा फटका पिकांनाही बसण्याची शक्यता आहे.

या वादळाचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसत आहे. या ठिकाणी समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. तसेच गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरही उंच लाटा उसळत आहेत. सुरक्षेसाठी चौपाट्यांवर 14 जूनपर्यंत पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोरबंदर, गिर-सोमनाथ आणि वलसाडमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.