Gukesh D : 17 वर्षीय गुकेशने इतिहास रचला, 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली

हिंदुस्थानचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत त्याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा सोबतची लढत बरोबरीत सोडविली आणि विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा गुकेश सर्वात तरुण खेळाडू ठरला असून त्याने गॅरी कास्पोरोव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. यासह विश्वनाथन आनंद याच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला हिंदुस्थानी ग्रँडमास्टर ठरला आहे.

तत्पूर्वी गुकेशने चूरशीच्या 13 व्या फेरीत फ्रान्सचा अव्वल खेळाडू फिरोउझा अलिझेरा याच्यावर विजय मिळवित जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले होते. 13 व्या फेरीत फिरोउझाविरुद्ध गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह डावाचा प्रारंभ केला. 63 चालीपर्यंत रंगलेल्या या अतिशय रोमहर्षक लढतीत अखेर गुकेशने बाजी मारली. या विजयास त्याने स्पर्धेत साडेआठ गुणांची कमाई करीत एकेरी आघाडी घेण्यात यश मिळविले.

दरम्यान, 14 व्या व अखेरच्या फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी पडली. ही लढत बरोरीत सोडवत गुकेशने विजेतेपद पटकावले. कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशची गाठ चीनच्या डिंग लिरेन याच्याशी पडणार आहे.