
डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 10 हजार 591 विद्यार्थ्यांनी प्रवेश कन्फर्म केले आहेत.
बारावीनंतर औषध निर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम असलेल्या डी. फार्मसीला प्रवेश दिला जातो. राज्यात 463 संस्थामध्ये डी. फार्मसीच्या 27 हजार 790 जागा आहेत. या जागावर राज्यभरातून 84 हजार 428 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी 49 हजार 268 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संस्था पर्याय भरले होते. यापैकी 24 हजार 970 विद्यार्थ्यांचे अॅलॉटमेंट झाले. अॅलॉटमेंट झालेल्यापैकी 18 हजार 485 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यापैकी 10 हजार 591 विद्यार्थ्यांनी प्रवेश कन्फर्म केले आहेत, तर 7 हजार 894 विद्यार्थ्यांनी बेटरमेंट पर्याय निवडला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना संस्था विकल्प भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या फेरीत संस्था विकल्प भरले असले तरी या फेरीत बदलता येणार आहेत. दुसरी फेरीचे अॅलॉटमेंट 16 डिसेंबरला होणार आहे. यावेळी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 17 ते 19 डिसेंबर या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. 20 डिसेंबरपासून तिसरी फेरी होणार असून 30 डिसेंबरला प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शेवटच्या टप्प्यात ज्या संस्थांना मान्यता मिळाली आहे अशा दहा संस्थांचा समावेश दुसऱया फेरीत होणार आहे. यामुळे 600 जागांची वाढ होणार आहे.


























































