दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण- खाडीपात्रातील पिस्तूल शोधण्यासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dabholkar-and-pansare-photo

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल खाडीपात्रात फेकण्यात आले. हे हत्यार शोधण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत परंतु पिस्तूल शोधण्यासाठी परदेशातील पाणबुडे ख्रिसमसनिमित्त आपल्या मायदेशी गेले असून ते हिंदुस्थानात आल्यावर पिस्तुलाचा तपास घेण्यात येईल. त्यासाठी तीन आठवडय़ांची मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती सीबीआयच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आली.

कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर नरेंद्र दाभोलकर यांचाही अज्ञात मारेकऱयांनी ऑगस्ट 2013 साली खून केला होता. या प्रकरणी दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीवेळी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तपास करणाऱया एसआयटीने तपास अधिकारी बदलावा असा अर्ज पानसरे कुटुंबीयांच्या वतीने दाखल केला होता. याबाबत गुरुवारी विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. तसेच तपास यंत्रणेकडून तपास प्रगतिपथावर असल्याचेही सांगितले. त्याची दखल घेत एसआयटीने तपास अधिकारी बदलावा यासाठी कुटुंबीयाने दाखल केलेल्या अर्जाचा विचार करावा. तसे केल्यास याचिककर्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता खंडपीठाने व्यक्त केली व 15 जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली.