दादर स्थानक स्मार्ट होणार! पुनर्विकासात बहुमजली कॉनकोर्स उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य आणि पश्चिम रेल्वे एकत्र येत असलेल्या आणि अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या दादर स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे. सीएसएमटी स्थानकापाठोपाठ दादर, भायखळा तसेच अन्य स्थानकांचा रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून विकास केला जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.

दादर रेल्वे स्थानकात एकूण 15 प्लॅटफॉर्म असून पश्चिम रेल्वेवर सात प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील दोन धिम्या लोकलचे तर तीन प्लॅटफॉर्म जलद  लोकलसाठी तर शेवटचे दोन प्लॅटफॉर्म लोकल व लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी वापरले जातात. उरलेले आठ प्लॅटफॉर्म मध्य रेल्वेवर आहेत. त्यातील तीन धिम्या मार्गिकेसाठी तर तीन प्लॅटफॉर्म जलद लोकलसाठी तर शेवटचे दोन लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी वापरले जातात. दादर स्थानकात मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके येथे एकत्र येत असून लोकलबरोबरच लांब पल्ल्यांचे टर्मिनसही येथे आहे. दादरला दररोज 5.5 लाख प्रवासी भेट देतात. तर सणासुदीला तसेच राजकीय सभांच्या वेळी ही संख्या आठ लाखांच्या पुढे जाते.

दादर स्थानकातील गर्दीचे समान वितरण व्हावे, पादचारी व प्रवाशांना कोणताही त्रास न होता त्यांचे आगमन व निर्गमन व्हावे असा दादर स्थानकाच्या पुनर्विकासामागचा उद्देश आहे. दादर स्थानकाच्या समांतर जाणाऱया लखमशी नप्पू रोड व सेनापती बापट मार्गावर स्थानकाच्या आत आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरील कोंडी दूर करण्याबरोबर प्रवाशांना ड्रॉप व पिकअपची व्यवस्था तयार केली जाणार आहे. तसेच लेव्हल-2 वर सर्व पादचारी पुलांना एकत्र जोडले जाणार आहे.

12.75 मीटर उंचीवर एलिवेटेड डेक उभारणार

दादर स्थानकाच्या उत्तर दिशेला प्लॅटफॉर्मपासून 12.75 मीटर उंचीवर एक वेगळा कॉनकोर्स लेव्हल डेक उभारण्यात येणार आहे. ज्याला टिळक पुलावरून थेट प्रवेश देण्यात येईल. या डेकशी अंतर्गत पादचारी पुलांनाही जोडले जाईल. लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉर्मवर जलद जाता यावे यासाठी कॉनकोर्स लेव्हलचे नियोजन आहे. उपनगरीय प्लॅटफॉर्म आणि स्थानकांवर बाहेरचा सूर्यप्रकाश आणि पावसाचे पाणी थेट आत येऊ नये यासाठी खास छताचे नियोजन असेल. हे स्थानक दिव्यांगांसाठी अनुकूल असेल तसेच ग्रीन एनर्जीचा वापर केला जाईल. दादर स्थानकाला सीसीटीव्ही आणि इतर यंत्रणांसह सुसज्ज असलेले आधुनिक बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टमचे एक स्मार्ट स्टेशन बनविण्याची योजना आहे. पुनर्विकासात बहुमजली कॉनकोर्स लेव्हल आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.