मराठमोळ्या फराळाचा परदेशात गोडवा, दादरच्या लज्जतदार फराळाला मोठी मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोंडाला पाणी सुटायला लावणारी खुसखुशीत करंजी, जिभेवर रेंगाळणारी चव देणारा बेसनचा लाडू, कुरकुरीत चकली, चमचमीत चिवडा आणि लहानथोरांची आवडती शंकरपाळी असा मराठमोळा लज्जतदार फराळ मुंबईकरांसह परदेशातील नागरिकांना चांगलाच पसंतीस पडला आहे. यासाठी दादरच्या सुप्रसिद्ध फराळ विक्रेत्यांकडून हा परदेशात पाठवण्यात आला आहे. दादरमधील पणशीकर मिठाईवाले, गोडबोले स्टोअर्स, दुग्धसागर, फॅमिली स्टोअर्स यांच्याकडून मराठमोळा फराळ अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि दुबईसारख्या देशात पाठवण्यात आला आहे.

फराळ, मिठाईसोबत घरगुती चॉकलेट

दादरच्या रानडे रोडवरील ‘दुग्धसागर’ मध्ये मिठाई आणि दिवाळीच्या फराळासोबत एकमेकांना भेट देण्यासाठी घरगुती चॉकलेट्स मिळतात. मँगो, पायनॅपल, रोज, रसमलई, पान अशा विविध फ्लेवरमध्ये त्यांच्याकडे चॉकलेट उपलब्ध आहेत.

सीमा कापूंकडे वर्षभर दिवाळी

शिवसेना भवनजवळ गेल्या 25 वर्षांपासून छोटेखानी व्यवसाय करणाऱया सीमा नायक या कापूंचा घरगुती फराळ खरेदी करण्यासाठी दूरवरून खवय्ये येतात. घरगुती पद्धतीने बनवलेला चविष्ट फराळ आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे दर ही त्यांची खासियत आहे. आमच्याकडील अनारसे, करंजी आणि वेगवेगळय़ा प्रकारच्या डाएट चिवडय़ांना वर्षभर मागणी असते, असे सीमा काकू सांगतात.

साजूक तुपातला रवा लाडू, शाही चिरोटे

सध्या अनेकांना डायबेटिससारख्या आजारांचा सामना करीत सण साजरा करावा लागतो. यासाठी आम्ही डाएट चकली, बेक करंजी आणि शंकरपाळे असे खास मेनू बनवतो. तसेच नियमित ग्राहकांसाठी साजूक तुपातला रवा लाडू, शाही चिरोटे, कडबोळी, फुलवलेला चिवडा यासारखा फराळ बनवून पाठवत असल्याचे फॅमिली स्टोअर्सचे अभिजित जोशी यांनी सांगितले.

पणशीकरांची दसऱयापासूनच फराळाची तयारी

आमच्याकडे दसऱयापासूनच फराळ बनवायला सुरुवात होते. गेल्या सतरा वर्षांपासून आमचा फराळ परदेशात पाठवला जातो. मुंबईकर परदेशातील नातेवाईकांसाठी फराळ पाठवतात त्याचप्रमाणे एनआयआरदेखील आपल्या इथल्या नातेवाईकांसाठी आमच्याकडून फराळाची ऑनलाईन ऑर्डर करतात. कॉर्पोरेट कंपन्यादेखील हल्ली आपल्या स्टाफसाठी ड्रायफ्रुट, चॉकलेटऐवजी खमंग फराळाची ऑर्डर देत आहेत, असे दादरच्या प्रसिद्ध पणशीकर मिठाईवाले दुकानाचे आशीष पणशीकर यांनी सांगितले. डाएट फराळ आणि पारंपरिक पद्धतीने तळलेला फराळ असे दोन्ही चॉईस ग्राहकांना दिले जातात. परंतु, लोक दिवाळीच्या काळात डाएट विसरून पारंपरिक फराळाचा मनमुराद आनंद घेतात. भाजणीची चकली, चिरोटे, करंजी, कडबोळी, तिखट शेव या त्यांच्या फराळाला मोठी मागणी आहे, असे दुकानाचे मालक सोनूशेठ पणशीकर यांनी सांगितले.

आम्ही 2005 पासून दिवाळी फराळ हँपर ही कन्सेप्ट राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये उटणे, रांगोळी, पॅलेंडर, पणत्या, खमंग फराळ असा संपूर्ण दिवाळीचा साज परदेशवासीयांना उपलब्ध करून दिला. हॅम्पर उघडा आणि दिवाळी साजरी करा, अशी ही कन्सेप्ट होती. या अनोख्या कन्सेप्टला आजही चांगलाच प्रतिसाद मिळतो. दरवर्षी फराळाचे हजारो पार्सल आम्ही परदेशात पाठवतो. आमच्या डाएट चकली, बेक शंकरपाळे, करंजी, अनारसे याला मोठी मागणी आहे. – सचिन गोडबोले, गोडबोले स्टोअर्स