
सामना प्रतिनिधी । पुणे
आषाढी वारीमध्ये कित्येक मैल पायी चालणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ३०० वीणेकऱ्यांना मानाचे फेटे देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतरपर्फे आयोजित कार्यक्रमात विविध दिंड्यांमधील वीणेकऱ्यांनी सन्मान स्वीकारत मानाचे पेâटे परिधान करून श्रीगणेशाची आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश्वर माउलींचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार, हभप रामभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील खंडोजीबाबा देवस्थान दिंडी क्र. २, शेडगे दिंडी क्र. ३, गो-हेकर संस्थान दिंडी क्र. ११, भोई समाज दिंडी क्र. २७, निकम दिंडी क्र. १६, नांदेडकर दिंडी क्र. १५, खडकतकर दिंडी क्र. १, मुक्ताबाई बेलगावकर दिंडी क्र. ५९ यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नवी पेठ विठ्ठल मंदिर दिंडी क्र. ४ आदी दिंडीतील वीणेकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात मानाचे फेटे देऊन सन्मान करण्यात आला.
रामभाऊ चोपदार म्हणाले, स्वच्छता अभियान, हरित वारी यांसारख्या ट्रस्टतर्फे राबविण्यात येणाऱ्यां उपक्रमांमुळे केवळ वारीपुरतेच नाही, तर वर्षभर ग्रामीण भागातील नागरिकांना नकळतपणे मदत मिळत आहे.
अशोकराव गोडसे म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून आषाढी वारीकरिता रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि भोजनासारखे अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा वारीतील वीणेकऱ्यांना मानाचे फेटे देऊन सन्मान करण्याची संधी ट्रस्टला मिळाली. यापुढेही वारकऱ्यांकरिता अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
































































