
>> महेंद्र पवार
निसर्गरम्य डहाणूच्या समुद्रातील ‘धवल लक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने हजारो किमीचा प्रवास करीत अखेर ओमानचा समुद्र गाठला आहे. या कासवावर डहाणूतील वन्यप्रेमींनी व तज्ज्ञ अभ्यासकांनी सॅ टेलाइट टॅग लावल्यामुळे त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. खोल समुद्रातील पर्यावरण, हालचाली, वनस्पती व अन्य बाबींचा अभ्यास करता येणार असून वन्यप्रेमी व अभ्यासकांना ती पर्वणी ठरणार आहे.
‘धवल लक्ष्मी’ नावाचे कासव गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी धाकटी डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळून
आले होते. या कासवाला दिनेश विन्हेरकर, डॉ. जान्हवी, प्राणीरक्षक प्रतीक वाहूरवाघ, रेमंड डिसोझा यांच्या टीमने उपचार केंद्रात आणले. तिथे कासवावर तज्ज्ञांमार्फत तीन ते चार महिने उपचार करण्यात आले. कासवाची तब्येत चांगली झाल्यानंतर त्याला सॅटेलाइट टॅग वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोहित मुदलियार, निधी म्हात्रे यांनी कासवावर सॅटेलाइट टॅग बसवला.
- कासव श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येताच सेन्सरच्या माध्यमातून त्याचे लोकेशन समजणार आहे. ठणठणीत बरे झाल्यानंतर हे कासव वन्यप्रेमींनी पुन्हा समुद्रात सोडले.
- धवल लक्ष्मीने गुजरातमधील सोमनाथ, पोरबंदर किनारपट्टीपर्यंतचा ४०० ते ४५० किमीचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. आता ही धवल लक्ष्मी ओमानच्या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचली आहे.
अभ्यासकांना नवी दिशा मिळणार
गुरुवारी वन्यतज्ज्ञांनी सॅटेलाइटद्वारे माहिती घेतली असता हे कासव समुद्राच्या खोल पाण्यातून पश्चिमेकडे प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. सॅटेलाइट टॅग लावलेले ऑलिव्ह रिडले जातीचे हे पहिलेच कासव असल्याने पर्यावरणीय दृष्टिकोनातून हा प्रयोग अभ्यासकांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.




























































