
कोरोनाच्या अंधःकारात दोन वर्षे गेली. उंचावर लटकवलेली दहीहंडी पह्डून त्यातील काला लुटण्याचा आनंद गोविंदांना घेता आला नव्हता. यंदा ते साहस करण्याची संधी पुन्हा मिळाली आणि सहा, सात, आठ, नऊ असे एकावर एक मानवी मनोरे रचून हंडय़ा पह्डण्याचा आनंद मुंबईसह महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनी मनसोक्त लुटला. ढाक्कुमाकुमच्या तालावर दहीहंडीचा थरार चांगलाच रंगला. ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत गोविंदांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली. गोविंदांसोबत गोपिकांनीही मानवी मनोरे रचण्याचे आपले कसब दाखवून सर्वांना अवाप् केले. नेहमीप्रमाणेच मुंबई आणि ठाण्यामध्ये गोविंदांचा जल्लोष पाहण्यासारखा ठरला.
हजारो गोविंदांच्या मोबाईलचे फ्लॅश लखलखले

शिवसेना भवनासमोरील जिप्सी कॉर्नर येथील युवासेनेची ‘निष्ठेची हंडी’ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीने गोविंदांचा उत्साह दुणावला. रात्रीच्या सुमारास उपस्थित हजारो गोविंदांनी आपल्याजवळील मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन करून ‘शिवसेना झिंदाबाद, युवासेना झिंदाबाद’ अशा घोषणाबाजीने शिवसेना भवनासमोरचा परिसर दुमदुमवून टाकला.

कांजूरची स्वराज्य प्रतिष्ठानची हंडी विक्रोळी स्वयंभू हनुमान मंडळाने फोडली. यावेळी आमदार सुनील राऊत. माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, उपेंद्र सावंत. शेखर जाधव, आनंद पाताडे, परम यादव उपस्थित होते.
कोरोनानंतरच्या यंदाच्या पहिल्या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुंबईतील प्रसिद्ध गोविंदा पथके आज बॅण्ड, कोंबडी बाजा, खालू बाजा, नाशिक बाजाच्या तालावर थिरकत ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत सकाळपासूनच दहीहंडय़ा फोडण्यासाठी बाहेर पडली. गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील दहीहंडी आयोजकांनी मोठमोठी बक्षिसेही लावली होती. सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांबरोबरच विविध राजकीय पक्षांनीही नाक्यानाक्यांवर दहीहंडीचे आयोजन केले होते. गिरगाव, भायखळा, लालबाग, दादर, परळ, माटुंगा, वरळी, प्रभादेवी, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर, घाटकोपर, विक्रोळी, कांजुरमार्ग आदी भागांमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दहीहंडी उत्सवाच्या आयोजनस्थळी बॉलीवूड कलाकारांनीही भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने गोविंदांचा उत्साह आणखीनच वाढला होता. अनेक कलाकारांनी मंचावर आपली कला सादर केली. गोविंदांनीही त्यांच्या तालावर ठेका धरत त्यांना दाद दिली. गोविंदांबरोबर यावेळी उपस्थित नागरिकांनीही नाचण्याची हौस भागवून घेतली. दहीहंडी आयोजनामुळे अनेक ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र उत्सवाला गालबोट लागू नये याची काळजी आयोजक आणि गोविंदा पथकांनीही घेऊन एक वेगळे उदाहरण घालून दिले.
आयडियलच्या गल्लीत अफझलखानाचा वध
दादर येथील आयडियलच्या गल्लीमधील दहीहंडी हे वर्षानुवर्षे गोविंदा पथकांची पहिली पसंती असते. यंदा अनेक गोविंदा पथके आणि गोपिकांनीही आयडियलच्या दहीहंडीला उपस्थिती लावली. एका गोविंदा पथकाने अफझलखान वधाचा थरारक मानवी मनोरा रचून सर्वांची वाहवा मिळवली. तिसऱया थरावर एका मोठय़ा फळीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी ही करामत करून दाखवली.

ताडदेव येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात सलग तिसऱ्या वर्षी ‘नवी जायफळ वाडी’ने ‘ममता चषक’ पटकावला. या उत्सवाला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, अरुण दुधवडकर, अरुंधती दुधवडकर, सुजीत राणे, हेमंत दुधवडकर, लता पाटील उपस्थित होते.
डीजे, बॅण्ड, रेनडान्स आणि बरेच काही

दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी गोविंदांच्या मनोरंजनाचीही पुरेपूर काळजी घेतली होती. उत्सवस्थळी डीजे दणाणत होता तसेच बॅण्ड पथकही आपली कला सादर करत होती. त्या तालावर गोविंदाही जोमाने एकावर एक मानवी थर रचून उंचावरची दहीहंडी गाठत होते. काही ठिकाणी आयोजकांनी गोविंदांवर पाण्याचे फवारे मारण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे गोंिवंदांना रेनडान्सचाही फील येत होता.

शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या वतीने कुरार व्हिलेज इथे ‘कल्पतरू युवा प्रतिष्ठान’च्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाला युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी भेट दिली. ही मानाची हंडी युवाराजे प्रतिष्ठानने सात थर लावून फोडली आणि 5 लाख 55 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.































































