कोरोना महामारीत जुने खेळाडू झाले सुस्त अन् लठ्ठ; चपळ बाळगोपाळांच्या शोधात गोविंदा पथके!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dahihandi

>>मंगेश मोरे

दहीहंडी म्हणजे मुंबईकर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा सण. कोरोना महामारीतील दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दहीहंडी निर्बंधमुक्त साजरी होणार आहे. पण हा सण अवघ्या 20 दिवसांवर आला असताना मुंबईतील अनेक गोविंदा पथके अजूनही सरावासाठी पूर्वीच्या जोशात मैदानात उतरलेली नाहीत. बरेचसे जुने खेळाडू कोरोना काळात सुस्त आणि लठ्ठ बनले आहेत. त्यामुळे दहीहंडीच्या वरच्या थरांवर चढवायचे कुणाला? असा प्रश्न पथकांपुढे उभा राहिला असून सर्वच पथके सध्या चपळ बाळगोपाळांचा शोध घेत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात इतर सण-उत्सवांप्रमाणे दहीहंडीचे थर लावण्यावरही निर्बंध आले होते. यंदा त्या सर्व निर्बंधातून दहीहंडीची सुटका झाली आहे. त्यामुळे पुन्हा आधीप्रमाणे दहीहंडीचे उंच-उंच थर लावता येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात नुकताच निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. पण प्रत्यक्षात सरावाच्या मैदानात दहीहंडीचा पूर्वीचा जोश राहिला नसल्याचा कटू अनुभव गोविंदा पथकांचे प्रशिक्षक घेत आहेत. जे जुने खेळाडू दहीहंडीसाठी तयार आहेत, त्यांना कोरोना काळात वाढलेल्या वजनामुळे वरच्या थरांवर चढणे शक्य होत नाही, तर काही खेळाडू सुस्त झाल्यामुळे दहीहंडीच्या सरावाला दांडय़ा मारू लागले आहेत. त्यामुळे आता चपळ आणि उत्साही बाळगोपाळांना आणायचे कोठून? वरच्या थरांवर कोणाला चढवायचे? कमी दिवसांत नवीन गोविंदा घडवायचे कसे? अशा विविध प्रश्नांनी गोविंदा पथकांच्या प्रशिक्षकांची मोठी पंचाईत केली आहे. अशा परिस्थितीत आपण यंदाच्या दहीहंडीत थरांचा थरथराट दाखवू शकणार नाही की काय? अशी चिंता प्रशिक्षकांना सतावत आहे.

गोविंदा सुस्तावले, सराव घ्यावा लागतोय आटोपता!

कोरोनाच्या आधी मुंबई-ठाण्यात दहीहंडीच्या उंच थरांसाठी प्रमुख गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागायची. त्यासाठी गुरुपौर्णिमेनंतर थरांचा नियमित सराव सुरू व्हायचा. गोविंदा दररोज दीड ते दोन तास सराव आणि तितकाच वेळ व्यायामाला द्यायचे. यंदा सरावासाठी गोविंदांना जमवताना फोनाफोनी करावी लागतेय. पूर्वी गोविंदा स्वतŠहून मैदानात आधीच हजर व्हायचे. रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत सराव केला जायचा. आता दहा-साडेदहा वाजले तरी सरावाला सुरुवात होत नाहीय, अशी खंत एका गोविंदा पथकाच्या प्रशिक्षकाने व्यक्त केली.

कोरोना काळात मागील दोन वर्षे दहीहंडीचे उंच थर लावू शकलो नाही. यंदा दहीहंडी निर्बंधमुक्त झाली आहे खरी, पण अनेक जुने गोविंदा दहीहंडीपासून दुरावले आहेत. काहीजण लठ्ठ झाल्याने त्यांना सराव किंवा वरच्या थरांवर चढणे अशक्य बनले आहे. तसेच कोरोना काळात नोकरी गमावलेल्या काहीजणांनी आता कुटुंबाला अधिक महत्त्व देत दहीहंडीच्या सरावाकडे पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीमुळे आम्हाला उंच थर लावण्यासाठी बाळगोपाळ सापडेनासे झाले आहेत.

z संदीप ढवळे, प्रशिक्षक, 

जय जवान गोविंदा पथक, जोगेश्वरी

मुंबईतील बरीचशी गोविंदा पथके सध्या चपळ बाळगोपाळांचा शोध घेताहेत. नव्या खेळाडूंना सहभागी करून घेताना पथकांना सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. गोविंदा पथकांनी नव्या खेळाडूंच्या सहभागातून दहीहंडीचा पूर्वापार जोश कायम राखावा, अशी अपेक्षा आहे. याचवेळी गोविंदांच्या सुरक्षेसाठी दहीहंडी उत्सव आयोजकांनीही पुढाकार घेऊन आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करावे.

z बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर होणार

19 ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी होणार असून यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत आहे. याची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली असून लवकरच दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.