दहिसरमधील पालिकेच्या जलतरण तलावाचे उद्घाटन, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसरमधील लिंक रोडवर मुंबई महापालिकेने बांधलेल्या नव्या जलतरण तलावाचे उद्घाटन नुकतेच झाले. त्यामुळे पश्चिम उपनगरात भावी जलतरणपटू घडण्यास मदत होणार आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या जलतरण तलावासाठी पाठपुरावा केला होता.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 1 मधील दहिसर पश्चिमेकडील सीटीएस 101, मास्टर शेफ हॉटेलसमोर, लिंक रोड येथे मुंबई महापालिकेच्या वतीने जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. उद्घाटनावेळी मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदूलकर, शाखा संघटक ज्युडीथ मेंडोसा, युवासेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर उपस्थित होते.

महिलांसाठी विशेष बॅच

जलतरण तलावात महिलांसाठी विशेष बॅच सुरू करण्यात आली आहे, तर शालेय विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. जलतरणातील प्रवेशासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. सकाळी 6 ते 11 नियमित बॅच, सकाळी 11 ते दुपारी 12 फक्त लेडीज बॅच, संध्याकाळी 5 ते 6 फक्त लेडीज बॅच, संध्याकाळी 6 ते रात्री 10 नियमित बॅच सुरू करण्यात आली आहे. यासाठी swimmingpool.mcgm.gov या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करता येणार आहे.