डायघरमधील दत्त मंदिराची जागा ग्रामस्थांच्या मालकीची

1059

डायघरमधील दत्त मंदिराच्या जागेवरून स्थानिक ग्रामस्थ आणि जागेचे मालक यांच्यात 100 वर्षांपासून सुरू असलेला वाद शिवसेनेच्या मध्यस्थीमुळे मिटला आहे. जागामालकाने ही जागा आता ग्रामस्थांच्या नावावर करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे या मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे डायघर गावातील दत्त मंदिर हे संदीप सावंत यांच्या 26 गुंठे जागेमध्ये उभे आहे. गट क्रमांक 36 ‘ब’मध्ये असलेल्या या जागेचा सातबाराही सावंत यांच्याच नावावर आहे. ही जागा मंदिरासाठी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. गेल्या 100 वर्षांपासून सावंत कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्यात हा वाद सुरू होता. मंदिराची जागा ताब्यात घेण्यासाठी जागेच्या मालकाने अनेक वेळा पोलीस बंदोबस्तात मोजणी आणली होती. त्यावेळी गावामध्ये संतापाची लाट उसळली होती. आजही या ठिकाणी मोजणीचे काम सुरू झाले. त्यावेळी शिवसेना माजी आमदार सुभाष भोईर हे मंदिराच्या परिसरात गेले. त्यांनी सावंत कुटुंब आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतर एक शतकापासून सुरू असलेला हा वाद मिटला.
जागेच्या विक्रीचा ठराव

मंदिराची जागा ग्रामस्थांना देण्यासाठी संदीप सावंत यांनी मोबदल्याची मागणी केली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. आज सुभाष भोईर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मंदिराच्या जागेची विक्री करण्यासाठी एका बैठकीत ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जागामालक सावंत, नगरसेकक बाबाजी पाटील, माजी नगरसेकक हिरा पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आणि डायघर गाकातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या