लखीमपूरमध्ये भाजप आमदाराला पोलिसांसमोरच चोपले
भाजप आमदार योगेश वर्मा यांना पोलिसांसमोर अक्षरशः पाठलाग करून मारहाण करण्यात आली. नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आपल्या समर्थक उमेदवाराचा अर्ज फाडल्याचा आरोप वर्मा यांनी करताच बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी त्यांना सुरुवातीला कानशिलात लगावली. यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. सभापती पुष्पा सिंग आणि माजी सभापती मनोज अग्रवाल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी आमदार योगेश वर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह संतापले आणि मारहाणीची घटना घडली.
ज्येष्ठ लेखक भा. ल. महाबळ यांचे निधन
विनोदी लेखन शैलीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ लेखक भा. ल. महाबळ यांचे आज मुलुंड येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. भा. ल. महाबळ यांची 70 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘अस्सा नवरा ते ‘हरि! हरि! विठ्ठल! विठ्ठल! असे 32 कथासंग्रह, ‘संसाराचा सारिपाट ते ‘आजोबांची सकाळ असे 21 लेखसंग्रह, ‘दत्ता द ग्रेट, ‘कृपा गौरीशंकराची’ या कादंबऱ्या, विनोदी चुटके, कुमार साहित्य यावरील अनेक पुस्तके याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे व ‘मसाप’सारख्या संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. माटुंगा येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या 60 व्या वर्षी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. महाबळ यांच्या पार्थिवावर मुलुंड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि दोन मुली असा परिवार आहे.
डेमिस, जम्पर यांना रसायनशास्त्राचे नोबेल
यंदा तीन शास्त्रज्ञांना 2024 जटील आणि गुंतागुंतीच्या प्रथिनांची रचना समजून घेण्यास मदत करणाऱ्या एआय मॉडेलचे जनक डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना आणि लसनिर्मितीसाठी प्रथिनांची रचना बदलून नवीन गुणधर्मांसह प्रथिने तयार करणाऱ्या प्रोटीन डिझाईन तंत्रासाठी ब्रिटिश शास्त्रज्ञ डोमिस हसाबिस यांना यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. 2003 मध्ये डेव्हिड बेकर यांनी अमिनो ऑसिडचा वापर करून नवीन प्रकारचे प्रथिने तयार केले आणि ते अनेक लसी तसेच औषधांमध्ये वापरण्यात आले.
केंद्र 2028 पर्यंत गरीबांना देणार मोफत धान्य
2024 ते डिसेंबर 2028 या दरम्यान प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य देण्यात येणार आहे. यासाठी 17,082 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात तब्बल 4406 कोटी रुपये खर्चून 2280 किलोमीटरचे रस्तेही बांधण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत मोदींनी सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
संजय रॉयच्या विरोधात 11 पुरावे
कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी संजय रॉयविरोधात सीबीआयने 11 पुरावे गोळा केले आहेत. हे सर्व पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले असून संजय रॉयला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्रात पीडितेला व्ही नावाने संबोधण्यात आले आहे. संजयचा डीएनए पीडितेच्या शरीरावर सापडला असून केसही सापडले आहेत.