
विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये दैनिक ‘सामना’ची जोरदार चर्चा होती. ‘सामना’तील बातमीचा उल्लेख करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शाब्दिक कात्रीत पकडताच आपण ‘सामना’चे ‘सबक्रीप्शन’ लावले असून ‘सामना’ वाचण्यास सुरुवात केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे मान्य केले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून दै. ‘सामना’ चर्चेत आहे. विधानसभेच्या पायर्यांवर बसून घोषणाबाजी करताना दै. ‘सामना’तील बातम्यांच्या कात्रणांचे बॅनर झळकवले होते. त्यानंतर शेतकर्यांच्या प्रश्नावर सभागृहात घोषणाबाजी करताना भाजपच्या सदस्यांनी दै. ‘सामना’च्या बातम्यांच्या बॅनरचाच आधार घेतला होता.
आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सत्ताधारी व भाजपच्या सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या. राज्यपालांवरील अभिभाषणावरील चर्चा असली तरी टक्केटोमण्यांनी सभागृहात हशाही उसळत होता
या चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दै. ‘सामना’चा जुन्या अंकांची प्रत बाहेर काढली आणि ‘सामना’मध्ये काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल छापून आलेल्या मजकुराचा उल्लेख केला. त्यावर शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख करू नका असा आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनीही आक्षेप घेत वर्तमानपत्रातील पूर्वीचा संदर्भ देऊ नका. शरद पवार यांचा संदर्भ कामकाजातून काढून टाका अशी सूचना केली. त्याचवेळेस शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनीही हरकतीचा मुद्दा उपस्थित करताना देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्याच वक्तव्याकडे लक्ष वेधले. आपण ‘सामना’ वाचत नाहीत असे आपण एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मग ‘सामना’चा पेपर कसा वाचला, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यावर आता मी ‘सामना’चे सबक्रीप्शन लावले आहे, मी ‘सामना’ वाचण्यास सुरुवात केली आहे असे फडणवीस यांनी मान्य करताच सभागृहात हशा उसळला. या चर्चेवर पडदा टाकताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांच्यासंदर्भातील वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. शरद पवार या सभागृहाचे सदस्य नाहीत. ते वरिष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख करू नका, अशा शब्दांत सदस्यांना समज दिली
चांगले लोक वेलमध्ये येत नाहीत
या चर्चेत अनेक सदस्य सहभागी होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सतत सदस्यांना कमी वेळेत भाषण करण्याचे आवाहन करीत होते. या चर्चेच्या निमित्ताने भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष तुम्ही पाच वर्षे संसदेत होतात असा उल्लेख केला त्याला उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संसदेत वेळेचे फार बंधन असते याकडे त्यांनी विरोधी पक्षनेत्यांचे लक्ष वेधले. भाजपचे सदस्य मागील दोन दिवस वेलमध्ये येऊन गदारोळ घालत होते. त्यावर कोणतेही भाष्य न करता विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांचे पंतप्रधानांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. ‘वेलमध्ये येतात ते चांगले लोक नसतात’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते याची आठवण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करून दिली. त्यावर आम्ही शिकतोय असे फडणवीस यांनी उत्तर दिले.

























































