दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. गजानन रत्नपारखी

समाजाची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या अध्यक्षपदी प्रख्यात हृदयरोगतज्ञ व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन रत्नपारखी यांची एकमताने निवड झाली. याचवेळी परिषदेचे पदाधिकारी व विश्वस्तांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी 2027 पर्यंत कार्यरत राहणार आहे.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभरातून इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. अध्यक्षपदासाठी डॉ. गजानन रत्नपारखी यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्योजक डॉ.आनंद पेडणेकर यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. त्यामुळे डॉ. रत्नपारखी यांची एकमताने निवड जाहीर झाली.

परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. आनंद पेडणेकर, सूर्यकांत कल्याणकर, अॅड. मनमोहन चोणकर, कार्याध्यक्षपदी नंदकिशोर वळीवडेकर, विजय पितळे, जितेंद्र पेंडुरकर यांची निवड झाली. सरचिटणीसपदी चंद्रशेखर दाभोळकर, सहाय्यक चिटणीसपदी सुनील देवरुखकर, महेश धामणस्कर यांची निवड झाली. खजिनदारपदी दिलीप मालंडकर, सहखजिनदारपदी संजीव वगळ तर दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या विश्वस्तपदी रवींद्र माहीमकर, मधुकर पेडणेकर, प्रमोद बेनकर, डॉ. विवेक रायकर व संजय वेदक यांची बिनविरोध निवड झाली. समाजाच्या सर्व स्तरांतील बांधवांना एकत्र आणून परिषद त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांनी दिली.