
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
तिबेटियन सर्वेच्च धर्मगुरू दलाई लामा आता उत्साहाने आणि जोमाने काम करू शकत नाहीत. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी नेमणे गरजेचे आहे. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी जर हिंदुस्थानातील असेल तर तिबेटचा कारभार हिंदुस्थानातच राहून चालू ठेवला जाऊ शकतो. दलाई लामांचा उत्तराधिकारी ही तिबेटी समुदायाची गोष्ट आहे असे म्हणणे चुकीचे होईल. आपल्या सुरक्षिततेसाठी आणि राजकीय धोरणासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.
तिबेटियन सर्वोच्च धर्मगुरू चौदावे दलाई लामा हे 6 जुलै रोजी वयाच्या 87व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यामुळे दलाई लामा, तिबेट, चीन आणि हिंदुस्थान या विषयाची चर्चा जरुरी आहे. हिंदुस्थानातील धरमशाला येथे असणारे दलाई लामा तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी शांततामय मार्गाने झुंज देत आहेत. दलाई लामांना जगाने आजवर 154 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी (ज्यात ‘नोबेल पारितोषिक’, ‘मॅगसेसे’, ‘टेंपलपन’, अमेरिकेचे काँग्रेगेशनल सुवर्णपदकाचा समावेश आहे) गौरविले आहे.
तिबेटियन जनतेच्या मनात दलाई लामांविषयीचा प्रचंड आदर आहे. 2008 मध्ये जो स्वातंत्र्याचा उठाव तिबेटमध्ये झाला, त्यानंतर दीडशेहूनही अधिक तिबेटियन तरुणांनी स्वातंत्र्याची आणि दलाई लामांना परत आणण्याची मागणी करत स्वतःला जाळून घेतले आहे. चीन दलाई लामांना ‘साधूच्या वेशातील लांडगा’ असे म्हणून त्यांचा अपमान करतो व तिबेटी समाजावर अन्याय करण्याचे चिनी सत्र सुरूच आहे. त्यामुळे वर शांत दिसणारा तिबेट चिनी हुकूमशाहीविरुद्ध बंड करून उठत आहे, पण चिनी सरकारपुढे ते निष्प्रभ ठरतात. तिबेटमधील सत्य दलाई लामा जगभरात सतत मांडत असतात. आता 100 देशांमध्ये तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे शेकडो गट तयार झाले आहेत. त्यामुळे चीन जगभरात पसरलेल्या तिबेटी समाजाचीही विविध प्रकारे अडवणूक करत आहे.
तिबेटमध्ये चिनी मँडेरिन हीच सक्तीची शिक्षण भाषा झाली आहे व तिबेटी भाषा समजू शकणारी तरुण पिढी नष्ट करण्यात आली आहे. तिबेटने आपली संस्कृती, भाषा, आपला इतिहास, आपले तत्त्वज्ञान टाकून देऊन संपूर्णपणे चिनी कम्युनिस्ट आचार-विचार पद्धती स्वीकारावी यासाठी चीन प्रयत्नशील आहे. संपूर्ण तिबेटी जनजाती, येथील वंशच नष्ट व्हावेत यासाठी तिबेटमधील वेगवेगळ्या कार्यालयांत काम करण्यासाठी हान वंशाच्या सुस्वरूप चिनी तरुणांची निवड केली जाते आणि त्यांनी तिबेटी मुलींशी लग्न करावे यासाठी प्रयत्न केले जातात, ज्यामुळे नवी पिढी हानवंशीय असेल आणि तिबेटी समाज कमी होईल.
चीन गेली 15-20 वर्षे तिबेटच्या धार्मिक बाबींमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाक खुपसू लागले आहेत. 25 वर्षांपूर्वी पंचेन लामांचा नवा पुनर्जन्म ज्या मुलाच्या रूपाने झाला आहे, अशी घोषणा दलाई लामांनी केली, त्या मुलाचे अपहरण चीनने केले. पंचेन लामा म्हणजे दलाई लामांच्या खालोखाल ज्यांचा आध्यात्मिक धार्मिक अधिकार असतो असे तिबेटी धर्मगुरू. ‘सर्वात लहान राजकीय बंदी‘ असे या अपहरणाचे वर्णन मानवाधिकार संघटना करतात. या पंचेन लामांना चीनने जगासमोर हजर केले नाहीच, पण आपल्या सोयीच्या अशा नव्या मुलाला त्यांनी ‘पंचेन लामा’ म्हणून घोषित केले. तिबेटच्या धार्मिक बाबींमध्ये नाक खुपसायचा चीनला अधिकार नाही. नव्या दलाई लामांची व पंचेन लामांची निवड हा सर्वार्थाने तिबेटी लोकांचा, अधिकार आहे,आजपर्यंत अमेरिका व 20 देशांनी स्वतंत्र तिबेट आणि दलाई लामा यांच्यासाठी आपापल्या पार्लमेंटमध्ये विधेयके पास केलेली आहेत. मात्र चीन त्याला दाद देत नाही.
तिबेटियन सर्वेच्च धर्मगुरु दलाई लामा आता पूर्वीच्या उत्साहाने आणि जोमाने काम करू शकत नाहीत. म्हणून त्यांचा प्रवास आणि भेटीगाठी कमी करण्यात आल्या आहेत. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी नेमणे आता गरजेचे आहे.15 वे दलाई लामा कोण असतील याविषयी गेल्या अनेक दशकांपासून चर्चा सुरू आहे, परंतु आता मात्र हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दलाई लामांचा उत्तराधिकारी ही आमची चिंता नाही, तिबेटी समुदायाची ती आध्यात्मिक आणि खासगी गोष्ट आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे होईल. हिंदुस्थानच्या सुरक्षिततेसाठी आणि राजकीय धोरणासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु दलाई लामा यांची बाजू घ्यायची की चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटची बाजू घ्यायची, की सगळीकडे विखुरलेल्या तिबेटियन नागरिकांच्या बाजूने जायचे याचे चित्र हिंदुस्थानात अजूनही स्पष्ट नाही. पुढचे दलाई लामा कोण? यावर चीनची भूमिका अगदीच स्पष्ट आहे. पुढील दलाई लामा कोण हे नुसते ठरवायलाच नव्हे, तर त्याच्या किंवा तिच्या शोधात महत्त्वाची भूमिका निभावण्याची त्यांची मनीषा आहे.
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी हा चीनच्या हातातील कठपुतळी असू नये यासाठी तो माझ्याच निवडीचा असेल अशी भूमिका दलाई लामांनी घेतली आहे. दलाई लामांनी अनेकदा तिबेटमध्ये परत जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी जर हिंदुस्थानातील असेल तर तिबेटचा कारभार हिंदुस्थानातच राहून चालू ठेवला जाऊ शकतो. जर तो हिंदुस्थान किंवा चीन दोन्ही देशांतील नसून दुसऱयाच देशाचा असेल तर तिबेट प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायापुढे येण्यास खूप मदत होईल. चीनच्या शक्तीपुढे दलाई लामा यांचा टिकाव कसा लागेल ते सांगता येत नाही.
हिंदुस्थानकडे काय काय पर्याय आहेत? दलाई लामांवर सर्व गोष्टी सोपवून आपण शांत राहण्याचा पर्याय घातक ठरेल त्यांनी जागतिक भौगोलिक माहात्म्य जाणले आहे, पण आपणही थोडय़ा प्रमाणात आपली धोरणे स्पष्ट करायला नकोत का? दलाई लामांना धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सहकार्य करत असताना त्यांनाही जोडीने हिंदुस्थानचे हित पाहायला हिंदुस्थान आणि तिबेट यांचे संबंध पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता जास्त मजबूत आहेत. आपल्याला ते तसेच बळकट ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. उत्तराधिकारी नेमण्याच्या प्रक्रियेत हिंदुस्थानचा हस्तक्षेप असणे गरजेचे आहे. आपण ही संधी गमावता काम नये.
काही तज्ञांच्या मते, शांततेच्या मार्गाने तिबेटी देत असलेला लढा, त्यांची सॉफ्ट पॉवर, आध्यात्मिक शक्ती ही चीनमधील हुकूमशाहीपेक्षा अधिक परिणामकारक ठरू शकेल. जेव्हा सोव्हिएत रशिया फुटला, अशा प्रकारे देश वेगळे होतील अशी कल्पना कोणाच्याही मनात आली नसेल. त्यामुळे तिबेटी लोकांना असे वाटते की, कधीतरी चीनच तुटेल आणि तिबेटला आपले स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल. मात्र, तिबेटी स्वातंत्र्य लढय़ाची वाट बिकट आहे. त्याला हिंदुस्थानींनी मदत करण्याची गरज आहे.





























































