
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात हरिओम नावाच्या एका दलित तरुणाला चोर समजून जमावाने क्रूरपणे मारहाण करून त्याला ठार मारले. या क्रूर हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेवरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश दलित, अल्पसंख्याक आणि मागास समुदायांसाठी नरक बनले आहे. जेव्हा काही राक्षस हरिओम या दलित व्यक्तीला क्रूरपणे मारहाण करतात आणि अभिमानाने बाबांचे लोक असल्याचा दावा करतात, जणू काही अशा अत्याचारांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. तेव्हा ते गप्प का आहेत?”
उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना केसी वेणुगोपाल म्हणाले की, “भाजपच्या मोठ्या दाव्यांनंतरही उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हे स्पष्ट आहे की, भाजप-आरएसएस राजवटीने दलित आणि पीडितांवर हल्ला करणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे.”