मुसळधार पावसानंतरही धरणांची पातळी खालावलेलीच!

45


सामना ऑनलाईन । मुंबई

गेले काही दिवस राज्यभरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला नवजीवन दिलं आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र आवश्यक तितकी वाढ झाली नसल्याचं दिसून येत आहे. पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर पुढील महिन्याभरात आशादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. गेल्या वर्षीही फारसा पाणीसाठा नसल्याने यंदा दुष्काळाची गंभीरता जास्त जाणवत होती. यंदा राज्यातील मुख्य धरणांमध्ये 17.52 टक्के इतकाच पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात मुसळधार पावसामुळे 28.77 टक्के इतकं पाणी जमा झालं होतं. मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, परभणी या जिल्ह्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षी 13.42 टक्के इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली होती. मात्र या वर्षी मराठवाड्यात पाऊस झाला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्याने अद्याप आवश्यक तितकी पातळी गाठलेली नाही. मराठवाड्यातील मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर या धरणांमध्ये जिवंत साठा शून्यावर पोहोचला आहे. या साठ्यात पुढील 30 दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पाऊस चांगला झाला तर तूट भरून निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, पुणे आणि कोकण या विभागांमध्ये चांगला पाऊस झाला असून पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. कोकण विभागात 44 टक्के इतका उपयुक्त जलसाठा असून पुणे विभागात 27 टक्के इतका साठा उपलब्ध झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या