निवेबुदृक धरणाच्या विहिरीला भगदाड , ग्रामस्थात घबराट

374

निवे बुद्रुक येथील जोशीवाडी धरणातील विहिरीचा एक भाग कोसळल्याने गावात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला तरी गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरीत होणे पसंत केले आहे.

दोन महिन्यपुर्वी भर पावसाळ्यात निवे बुद्रुक जोशीवाडी धरणालगतच्या जमिनीला तडे जाण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी धरणा बाजुची जमिन खचू लागली होती. तर तडे वाढत जाऊ लागल्याने भयभित झालेल्या ग्रामस्थांनी आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी संपर्क केला. आमदारांनी पाटबंधारेविभागाच्या रत्नागिरी आणि देवरूख येथील अभियंत्यांना पाचारण केले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर वरिष्ठ भुगर्भ शास्त्रज्ञ रश्मी कदम यांनी या परिसराची पाहणी करून हा प्रकार जमिन खचण्याचाच असून याचा धरणाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर या परिसरात ग्रामस्थांना प्रवेशबंदी करून पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणावर चौकीदार नेमण्यात आला होता.

रविवारी सकाळी काही ग्रामस्थ धरणावर गेले असता त्यांना धरणाच्या भिंतीलगत असलेली विहिर ढासळल्याचे दिसून आले. ही गोष्ट तातडीने सोशल मिडीयावरून व्हायरल झाली आणि निवे गावात एकच घबराट पसरली. धरण फुटल्याच्या अफवाही पसरवण्यात आल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले. दरम्यान याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे देवरूख मधील अभियंता संजय मुंगळे, निवे सरपंच अजित माने, लघु पाटबंधारे निवेचे कर्मचारी संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय राऊत, अरूण राजवाडे, नारायण राजवाडे, अमित गुरव आदींसह धरणाची पाहणी केलीच शिवाय ढासळलेल्या विहिरीची पाण्यात उतरून पाहणी केली असता केवळ एकाच बाजुची भिंत कोसळल्याचे दिसून आले. याचा धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण मुंगळे यांनी ग्रामस्थांना दिले.

असे असले तरी धरणालगत असलेल्या शिंदेवाडीतील काही ग्रामस्थांनी सुरक्षीततेचा उपाय म्हणून नातलगांकडे स्थलांतरीत होणे पसंत केले आहे. धरण सुरक्षित असताना विहिर कोसळली कशी असा सवाल उपस्थित झाला असून पाटबंधारे विभागाने तातडीने धरणाचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या