
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी पाझर तालावाला भगदाड पडल्याने फणसवणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 1980 मध्ये या पाझर तलावाचे बांधकाम करण्यात आले होते. यावर सुमारे 10 गावांची प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात आली होती. प्रादेशिक नळपाणी योजनेसहर उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.
या पाझर तलावाची अवस्था चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणासारखी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या पाझर तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मे महिन्यात देखभाल दुरुस्तीसाी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग होतो त्या फरशीला आतील बाजूने पिचिंग करण्यात आले होते. पाझर तलावात पाणीसाठा जास्त झाल्यास तो सोडण्यासाठी असणारे दरवाजे नादुरुस्त झाले आहेत. पाझर तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करुनही धरणाच्या फरशीला भगदाड कसे पडले, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने संगमेश्वर, खेड, चिपळूण तालुक्यात महापूर आल्याने अनेकांचे संसार पाण्या खाली गेले. कित्येक बेघर झाले तर काहींना जीवाला मुकावे लागले. या घटनेनंतर पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील धरणाची पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी या ठिकाी आलेला नाही. मंगळवारी सकाळी पाझर तलावाजवळ काही ग्रामस्थ गेले असता त्यांना धरणाच्या फरशीला भागदाड पडल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच कळंबस्तेचे ग्रामपंचायत सदस्य राजु पाटील यांनी, गावचे सरपंच, तलाठी आणि ग्रामस्थांसह पाहाणी केली. धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतो, त्याठिकाणी बाहेरच्या बाजूला भगदाड पडल्याचे दिसून आले. सरपंचांनी तलाठी यांना याबाबत संगमेश्वरचे तहसीलदार यांना माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच धरणाखालील गावांना सावधागिरीचा इशारा देण्यात यावा, असेही सांगितले. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेत, याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागी ग्रामस्थांनी केली आहे.
























































