
या वर्षी आठवडाभर आधीच मान्सून येणार असा हवामान यंत्रणांचा अंदाज चुकला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा असल्याने मुंबईकरांना सध्या तरी टेन्शन नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत उन्हाळय़ात 10 ते 15 टक्के कपात केली जात असताना या वर्षी मागील तीन वर्षांतील सर्वाधिक पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत तलावांत एकूण 212461 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी पुढील 55 दिवसांना पुरणारे आहे.
गेल्या काही वर्षांपासून उशिरा सुरू होणारा पाऊस आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे मे-जून महिन्यात मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी पालिका मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही राबवत आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यातील 27 टक्के पाणी गळतीमध्ये वाया जात असल्याने काही भागांत पाणीपुरवठय़ावर परिणाम होते. मात्र या वर्षी तलावात समाधानकारक जलसाठा असल्याने सध्या तरी पाणीकपात टळली आहे.
‘समुद्राचे पाणी गोडे करण्या’साठी जागतिक निविदा
– मनोरी येथील इस्रायली तंत्रज्ञानाच्या प्रस्तावित निःक्षारीकरण (खारे पाणी गोडे करणे) प्रकल्पात सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर तर प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दररोज 400 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता येणार आहे.
– या प्रकल्पासाठी कार्यवाही वेगाने सुरू असून ऑगस्टपर्यंत जागतिक निविदा मागवण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ‘एमटीडीसी’कडून मिळणाऱ्या 12 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
तीन वर्षांत 8 जूनचा जलसाठा
2022 212461 दशलक्ष लिटर (14.68 टक्के)
2021 185864 दशलक्ष लिटर (12.84 टक्के)
2020 206205 दशलक्ष लिटर (14.25 टक्के)
सध्याचा पाणीसाठा
मोडकसागर 46639 दशलक्ष लिटर
तानसा 10859 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा 44790 दशलक्ष लिटर
भातसा 104210 दशलक्ष लिटर
विहार 3645 दशलक्ष लिटर
तुलसी 2319 दशलक्ष लिटर

























































