
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोली एस.टी. आगारातील बसेसना धक्का मारुन गाडी सुरु करण्याची नामुष्की येत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दापोली एस.टी. आगार हे महत्वाचे आगार आहे. या आगारातून विविध मार्गावर लांब पल्ल्याच्या तसेच तालूकातर्गंत गावातील एस.टी.बसेस फेऱ्यांसह जवळ पल्ल्याच्या अन्य तालूक्यात बस फे-या सुरू आहेत. त्यामुळे हे आगार तसे कायमच प्रवाशी भारमानामुळे नफ्यातील एस.टी आगार आहे. अशा या दापोली एस.टी. आगारातील एस.टी. बसेसची झालेली दयनीय अवस्था ही प्रवाशांना त्रासाची होत आहे असाच प्रकार हा सोमवारी घडला.
दापोली एस.टी. आगारातून पाजपंढरी येथे प्रवाशांना घेवून निघालेली एस.टी बस क्रमांक एम.एच.14 बिटी 2654 ही बस पाजपंढरी येथे गेली असता परतीच्या प्रवासासाठी निघाली असता बस सुरूच होत नव्हती अखेर बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि या बसला धक्का मारून बस स्टार्ट करण्यात आली. पाजपंढरी येथून सकाळी 10 वाजता सुटणा-या या बसेसमध्ये प्रवाशांसह विदयार्थी प्रवाशांचे भारमान अधिक असते. खास विदयाथ्र्यांसाठीच ही बस फेरी सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र बसच्या या दुरवस्थेमुळे प्रवाशांच्या खोळंबा झालाच शिवाय विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली. त्यामुळे महाविदयालयात शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी निघालेल्या विद्यार्थांना उशीर झाला.
दापोली एस.टी. आगाराच्या अनागोदी कारभारामुळे आधीच अनियमित बस सोडल्या जातात. बसेसना धड खिडक्या नाहीत. काही बसेस गळक्या आहेत तर काही बसेसचे इंजीन स्टार्ट करण्यासाठी प्रवाशांवरच धक्का मारण्याची वेळ येते तर काही बसेस या मध्येच रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार घडत असतात त्यामुळे प्रवाशी भारमान असलेल्या मार्गावर प्रवाशांची चांगलीच गरसोय होते त्यामुळे दापोली आगाराने आपल्या बसेस सुधारण्याकडे अधिक लक्ष दिले पाहीजे. सुरक्षित प्रवास हे ब्रिद घेवून धावणा-या एस.टीचीच प्रकृती बिघडत असल्याने प्रवाशांची एस.टी.ला सुरक्षा आहे का ? अशाप्रकारचा प्रश्न एस.टी.बसला स्टार्ट करण्यासाठी धक्का मारावा लागल्याने पुढे आला आहे.

























































