
दापोली शहरात एकमेव स्वच्छतागृह असून तेही बंदच आहे.त्यामुळे दापोली नगर पंचायत प्रशासन नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यास सपशेल फेल ठरली आहे. दापोली नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शहरात येणाऱ्यांना आपल्या प्रातः विधी उघडयावर उरकाव्या लागत आहेत. या प्रकाराने शहरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचे साम्राज्य वाढले असून विविध प्रकारचे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.
दापोली शहरात दापोली दाभोळ मार्गावर एकमेव असलेले स्वच्छतागृह नगर पंचायतीने बंद ठेवून अस्वच्छतेला प्राधान्य दिल्याने नगर पंचायतीच्या एकुणच कारभाराची यावरून कार्यक्षमता सिध्द झाली आहेच शिवाय प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराला अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधींचाही पांठींबा आहे की काय ? आणि त्यामुळेच सत्ताधाÚयांनी या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जनतेच्या सोयी सुविधांकडे पाठ फिरवली आहे.
दापोली शहराची झपाटयाने वाढत चाललेली लोकसंख्या तसेच शहरालगतच्या गिम्हवणे, जालगाव, टाळसुरे, खेर्डी, मौजे दापोली, चंद्रनगर आणि गव्हे महसुली गावांचे झपाटयाने वाढत चाललेले शहरीकरण पाहता त्याचा अधिक ताण हा दापोली शहरातील उपलब्ध सोयी सुविधांवर पडत आहे. दापोली शहर हे तालूक्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून आपल्या शासकिय, निमशासकिय, बॅकिंग, व्यापारउद्दीम, रोजगार तसेच शैक्षणिक कामांसाठी येणाऱ्यांची दिवसेगणिक वाढतीसंख्या तसेच वाढते पर्यटन पाहता त्यांच्या सोयीसाठी नगर पंचायतीने दापोली दाभोळ मार्गावर एक स्वच्छतागृह बांधले आहे.
या स्वच्छतागृहासाठी शासनाचे जवळपास 32 लाख रूपये खर्च झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात स्त्री पुरूषांसाठी स्वतंत्र अशा स्नानगृहासह मुतारी आणि शौचालयाचा यात समावेश आहे. मात्र सर्व सोयीयुक्त आणि जवळपास 32 लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेले हे स्वच्छतागृह सदासर्वदा बंदच ठेवण्यात नगर पंचायत धन्यता मानत आहे. वास्तविक पाहता राज्य शासनासह केंद्र शासन स्वच्छतेवर खुप मोठा निधी खर्च करत असते. दरवर्षी शासनाकडून विविध प्रकारच्या स्वच्छता कार्यक्रमांच्या स्पर्धा राबवून जनजागृती करण्यात येत असली तरी दापोली नगरपंचायत मात्र त्याला अपवाद ठरली आहे.






























































