
दक्षिण मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक राधा कलीनदास दरयानानी यांच्या दरयानानी ट्रस्टने सैन्यदलासाठी 25 कोटींची जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. या जमीनीवर राज्यातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या सैन्याच्या लॉ कॉलेजचा विस्तार करण्यात येणार आहे. दरयानानी ट्रस्टने सैन्य दलासाठी दुसऱ्यादा जमीन दिली आहे. सैन्यदलासाठी व्यक्तीगत मदत करण्यात प्रेम दरयानिनी अग्रेसर आहेत. त्यांनी मार्च 2018 मध्ये सैन्य दलासाठी सहा तयार इमारती आणि चार एकर जमीन दिली होती. आता पुन्हा प्रेम दरयानिनी यांनी सैन्यदलासाठी दोन एकर जमीन दिली आहे. सैन्य दलासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या जमीनीवर सैन्याच्या लॉ कॉलेजचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. देशात सैन्याचे दोन लॉ कॉलेज आहेत. चंदीगढमधील मोहाली येथे एक आहे. तर दरयानानी ट्रस्टच्या मदतीने पुण्याजवळील कान्हे गावात एक बांधण्यात आले आहे. त्यातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. या लॉ कॉलेजच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमीपूजन दक्षिण विंगचे कमांडर इन चिफ लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण विंगचे अनेक अधिकारी उपस्थित होते. देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदल नेहमीच सतर्क असते. सामान्य जनतेसोबत आल्यानंतर आमचे मनोबल वाढत असल्याचे सैनी यांनी सांगितले. देशातील जनता सैन्यदलाला कृतज्ञतेच्या भावनेतून करत असलेल्या मदतीबाबत त्यांनी समाधन व्यक्त केले. दरयानानी ट्रस्टप्रमाणे इतरानीही सैन्यदलाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या अंतर्गत आणि बाहेरच्या शत्रूंशी मुकाबला करताना अनेकदा जवान प्राणांची बाजी देतात. आपल्या धाडसी सैन्यदलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मदत करत असल्याचे राधा कलिनदास दरयानानी ट्रस्टचे प्रमुख प्रेम दरयानानी यांनी सांगितले. या जवानांमुळेच आपण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटाच्यावेळीही ते मदतीसाठी तत्पर असतात. त्यामुळे आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करावे ही जनतेची जाबाबदारी आहे, असे ते म्हणाले.



























































