
सामना प्रतिनिधी । कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत आघाडीच्या दशावतारी कलावंतांचा सहभाग असलेल्या संयुक्त दशावतारी नाट्य मंडळाने गोवा येथे भक्त पुंडलिक हा नाट्यप्रयोग सादर करून नाट्यरसिकांची मने जिंकली. उपस्थित रसिकवर्गानेही या कलावंतांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली.
रवींद्र भवन सांखळी-गोवा व सृजन्य युवा सत्तरी यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र भवन सांखळी-गोवा येथे सिंधुदुर्गातील संयुक्त दशावतारी नाट्य मंडळाचा ‘भक्त पुंडलिक ’ हा नाट्य प्रयोग रविवारी पार पडला. गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. गोवा कला अकादमीचे संजीव झरमेकर, सृजन्य युवा सत्तरीचे अध्यक्ष गजानन गावस, कवठी युवक मित्रमंडळ, मुंबईचे अध्यक्ष संजय करलकर, लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळचे अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, नाट्यप्रेमी प्रसाद परब (मोरजी), दिपक भोगटे (कुडाळ), संजय मांजरेकर, रामकृष्ण दळवी, राजा सामंत आदींसह सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई व बेळगांव या भागातील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती सावंत यांनी या नाट्यप्रयोगाला शुभेच्छा दिल्या. उपस्थित अन्य मान्यवरांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी सभापती श्री. सावंत यांच्या हस्ते दशावतारी कलावंत हरिश्चंद्र गांवकर, आनंद कोरगांवकर, केशव खांबल तसेच लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळचे अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, कवठी युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय करलकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. गजानन गावस यांनी नाट्यप्रयोग आयोजनामागील हेतू विशद केला. निवेदन बादल चौधरी (वालावल)यांनी केले.
या नाट्यप्रयोगात सर्वच कलाकारांनी दशावतारी कला सादर करून रसिकांनीची मने जिंकली. यात गणपतीची भूमिका काका कलिंगण, भक्त पुंडलिकाची पप्पू नांदोस्कर तर कृष्णाची भूमिका दत्तप्रसाद शेणई यांनी साकारली. कृष्णा घाटकर यांनी जानुदेव, पंढरी घाटकर यांनी सत्या तर बाळ कलिंगण यांनी ताराची भूमिका साकारत उपस्थितांना भारावून सोडले. उल्हास नाईक यांनी कुकुटस्वामी, बाबा मयेकर यांनी जरागंध, सुधिर तांडेल यांनी रुक्मिणी, दादा राणे-कोणसकर यांनी दिंडीकासूर, प्रशांत मयेकर यांनी शिशूपालची भूमिका साकारली. त्यांना हार्मोनियम पप्पू घाडीगांवकर, मृदंग चेतन मेस्त्री व तालरक्षक विनायक सावंत यांनी त्यांना संगीतसाथ दिली. रविंद्र भवन संपूर्ण नाट्यरसिकांच्या गर्दीने तुडूंब भरले होते.





























































