
विविध कारणात्सव आपण जुना मोबाईल नंबर बंद करून नवीन नंबर घेतो. पुढे आपल्या जुन्या नंबरचे काय झाले, याचा साधा आपण विचारही करत नाही. परंतु याच जुन्या नंबरमुळे तुमची खासगी माहिती चोरी होऊ शकते, असा इशारा प्रिन्स्टन विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या एका संशोधनाच्या आधारे दिला आहे.
एखाद्या ग्राहकाने मोबाईल नंबर बदलल्यानंतर ठराविक दिवसांनंतर मोबाईल कंपन्या तो जुना मोबाईल नंबर रिसायकल करून नव्या युजरला देतात. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार हीच प्रक्रिया आधीच्या युजरच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी मारक ठरतेय. रिसायकल नंबरमुळे नव्या युजरला जुन्या युजरच्या नंबरशी निगडित सगळी माहिती सहज उपलब्ध होते.
हे आहेत धोके
विद्यापीठाने या संशोधनासाठी 200 रिसायकल नंबरचा अभ्यास केला होता. त्या नंबरवर जुन्या युजरसाठी कॉल, मेसेज आणि ओटीपी क्रमांक येत होते. रिसायकलिंग नंबरमुळे फिशिंग हल्ल्यांपासून ते अलर्ट, न्यूज लेटर, चॅटिंगद्वारे फसवणूक धोक्यांची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
अशी घ्या काळजी
हल्ली प्रत्येक गोष्ट स्मार्टफोनमध्ये स्टोअर केलेली असते. काही जण नवीन नंबर डिजिटल खात्यात अपडेट करत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी जुना नंबर तसाच राहतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती मिळवून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे फोन नंबर बदलल्यानंतर आधीच्या नंबरशी निगडित सर्व डिजिटल अकाऊंटमध्ये आपला नवीन क्रमांक अपडेट करून घ्या.


























































