
सामना प्रतिनिधी । अलिबाग
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दत्ता ढवळे यांनी जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांना पाठविला आहे. 23 जून रोजी होणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरवर दत्ता ढवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये पक्षाला मोठा झटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून दत्ता ढवळे हे पक्षात होते. पक्षात असताना अनेक पदावर निष्ठावन्त काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले होते. चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली उभारी दिली होती. जनसंपर्क मोठा असल्याने त्यांच्या जाण्याने पक्षाला काही प्रमाणात हानी पोहचणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अपमानास्पद वागणूक होत असून राजकीय घुसमट होत असल्याचे कारण देत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आहे. चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी पत्नीला ग्रामविकास आघाडीतर्फे तिकीट दिले आहे. त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत चांगले यश दिले तर जो पक्ष विकासासाठी मदत करेल त्या पक्षात आगामी काळात जाऊ असे दत्ता ढवळे यांनी सांगितले.



























































