
राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असून त्यामुळे पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे मानले जाते.
दोन राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार निवृत्त होत असल्याने पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. पडसलगीकर हे 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते उपलोकायुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.
मुंबईतील कुख्यात गुंड अमर नाईकला त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आले होते. पडसलगीकर यांनी अरुण गवळी टोळीचेही कंबरडे मोडले होते. तसेच पोलीस उपायुक्तपदी असताना कामाठीपुऱयातील कुंटणखान्यातून त्यांनी 450 अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांचे पुनवर्सन केले होते. नागपूरमध्ये असताना त्यांनी मटका आणि बेकायदेशीर दारू अड्डय़ांवर कारवाई केली होती. पोलीस अधीक्षक असताना धाराशीवमध्ये निजामाविरोधातील कारवाईत शहीद झालेल्या पोलिसांच्या पत्नींची माहिती मिळविल्याने त्यांच्या प्रयत्नाने शहीद पोलिसांच्या पत्नींना 30 वर्षांनंतर पेन्शन सुरू झाली.
पोलिसांच्या आठ तासांच्या डय़ुटीचे शिल्पकार
पडसलगीकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली. त्यांनी नागपूर, कराड, नाशिक अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. मुंबईत पोलीस उपायुक्त असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबाबत त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 2010 ते 2014 काळात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात काम केले. ‘आयबी’मध्ये दहा वर्षे काम केल्यानंतर 2016 मध्ये पडसलगीकर यांनी जावेद अहमद यांच्याकडून मुंबईचे 40वे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली होती. धाराशीव आणि साताऱयाचे ते पोलीस अधीक्षक होते. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासात त्यांनी पहिल्यादाच आठ तास डय़ुटी ही संकल्पना आणली.
























































