दाऊदच्या चार मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव

आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या चार मालमत्तांचा 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा लिलाव होणार आहे. खेडमधील या मालमत्ता असून त्या अमली पदार्थ प्रतिबंधक तसेच तस्करी कायद्यान्वये  जप्त करण्यात आलेल्या आहेत. या मालमत्तांच्या लिलावातून 20 लाख रुपये मिळतील, असा अंदाज आहे.

दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी फारसे पुणी पुढे येत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र 2017 नंतर लिलाव जाहीर झाल्यानंतर प्रतिसाद मिळू लागला. आतापर्यंत दाऊद व कुंटुंबीयांच्या मालमत्तांचा लिलाव यशस्वी झाला आहे. परंतु खेडमधील या मालमत्तांच्या लिलीवाला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पुन्हा लिलाव करण्यात येणार असून सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.  यावेळी या मालमत्तांचा लिलाव पूर्ण करण्याचा यंत्रणांचा प्रयत्न आहे.

खेडमधील 171 चौरस मीटर शेतजमिनीसह उर्वरित अनुक्रमे दहा हजार 420 चौरस मीटर तसेच आठ हजार 953 चौरस मीटर भूखंडांसह दोन हजार 240 चौरस मीटर अशा 20 लाख आरक्षित किंमत असलेल्या भूखंडांचा लिलाव होणार आहे.

आतापर्यंत झालेले लिलाव

14 नोव्हेंबर 2017 ः दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा लिलाव होऊन सैफी बुऱहाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने 11.05 कोटींना त्या खरेदी केल्या.

9 ऑगस्ट 2018 ः मसुल्ला बिल्डिंग (अमीना मॅन्शन) सैफी बुऱहाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने साडेतीन कोटी रुपयांत खरेदी केली.

1 एप्रिल 2019 ः दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा नौपाडा येथील 600 चौरस फुटाचा फ्लॅट 1.8 कोटींना लिलावात विकला गेला.

10 नोव्हेंबर 2020 ः दाऊदचे वडिलोपार्जित घर तसेच खेडमधील सहा मालमत्तांचा 22.8 लाखांना लिलाव झाला.

5 जानेवारी 2024 ः खेडमधील दाऊदच्या पुटुंबीयाचा भूखंड 3.28 लाखांना लिलावात दिल्लीतील अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केला.