
सामना ऑनलाईन, मुंबई
पैशांच्या वादातून मुंबईतल्या एका व्यापाऱ्याला गँगस्टर फईम मचमचकरवी धमकावल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मोठी कारवाई केली. सहकारी व्यापाऱ्याला धमकावण्यासाठी फईम मचमचला सुपारी देणाऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्यासह या कटात सहभागी असलेला दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इक्बाल कासकरचा मुलगा मोहम्मद रिझवान इक्बाल हसन शेख इब्राहिम (30) व सुरतमधला गुंड अहमदरजा वधारिया यांना बेडय़ा ठोकल्या आहेत.
सुलतान (नाव बदललेले) आणि अश्फाक रफिक टॉवेलवाला हे दोघे व्यापारी असून भागीदारीत चीन व दुबई येथून इलेक्ट्रॉनिक वस्तू हिंदुस्थानात आयात करायचे काम करीत होते. दोघांमध्ये 15 लाख 50 हजारांहून वाद सुरू झाला होता. अश्फाकने सुलतानला गप्प करण्यासाठी अहमदरजा वधारिया याला सांगितले. मूळचा सुरतचा आणि सध्या दुबईत वास्तव्यास असणाऱ्या वधारियाने यासाठी दाऊदचा पुतण्या रिझवानशी संपर्क साधला. मग रिझवानने वधारियाची फईमशी ओळख करून दिली.
गँगस्टर्सची मोडस् ऑपरेंडी बदलतेय
90 च्या दशकात मुंबईत गँगवॉर जोरात होते. तेव्हा थेट गँगस्टर कोणाकडेही खंडणी मागायचे, पण आता गँगस्टर्सनी आपल्या कामाची पद्धत बदलल्याचे या कारवाईतून समोर येत आहे. एका व्यापाऱ्याला धमकावण्यासाठी दाऊदच्या पुतण्याची मध्यस्थी, मग त्यानंतर फईम मचमचकडून धमकावणे हा प्रकार नवीन असून यात सखोल चौकशी करावी लागणार असल्याचे उपायुक्त नलावडे यांनी सांगितले.
रिझवानने मध्यस्थी केल्यानंतर फईम मचमचने सुलतानशी संपर्क साधला आणि पुन्हा टॉवेलवालाकडे पैसे मागू नको अशी तंबी दिली. यामुळे घाबरलेल्या सुलतानने मुंबई गुन्हे शाखेकडे धाव घेतली. दरम्यान, वधारिया सध्या मुंबईत आला होता. तो 15 तारखेला दुबईला पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला विमानतळावर पकडले.
वधारियाची चौकशी केल्यावर दाऊदचा पुतण्या रिझवान कासकर ऊर्फ शेख यानेच मध्यस्थी करीत वधारियाची दाऊदचा हस्तक फईम मचमच याच्याशी ओळख करून दिल्याचे समोर आले. रिझवान दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.
वधारिया आणि रिझवानला बेडय़ा ठोकल्यानंतर पोलिसांनी आज सहकारी व्यापाऱ्याची सुपारी देणारा अश्फाक टॉवेलवाला याला अटक केली. तिघांनाही कोर्टात हजर केले असता त्यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.





























































