दिवस-रात्र कसोटी हाऊसफुल; पहिल्या तीन दिवसांची तिकिटे संपली

880

क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानमध्ये प्रथमच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना होणार आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडनगार्डन स्टेडियमवर शुक्रवारपासून हिंदुस्थानबांगलादेशदरम्यान हा सामना सुरू होईल, तेव्हा हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला जाईल. देशातील पहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेट शौकीन उत्सुक असल्याने स्टेडियम हाऊसफुल झाले आहे. 68 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या या स्टेडियमवरील पहिल्या तीन दिवसांची तिकिटे एका झटक्यात संपली हे विशेष!

नाममात्र तिकीट दर

बंगाल क्रिकेट असोसिएशनने मुद्दामहून देशातील पहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याचे तिकीट दर हे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना परवडतील असे नाममात्र ठेवले आहेत. 50, 100 150 असे या कसोटी सामन्याचे तिकीट दर आहेत. ईडन गार्डनवरील गर्दी बघून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नक्कीच खूश होईल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले.

दिवसरात्र कसोटी क्रिकेटचा इतिहास

टीम इंडियाप्रथमच दिवसरात्र कसोटी क्रिकेट खेळणार असली तरी हिंदुस्थानबांगलादेशदरम्यान होणारा हा सामना क्रिकेटच्या इतिहासातील बारावा दिवसरात्र कसोटी सामना असेल. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियान्यूझीलंडदरम्यान पहिला दिवसरात्र कसोटी सामना झाला होता. आतापर्यंत ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिक पाच दिवसरात्र कसोटी सामने खेळले असून पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये दिवसरात्र कसोटीचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकाता कसोटीनंतर दिवसरात्र कसोटी सामन्याचे आयोजन करणारा हिंदुस्थान हा सातवा देश ठरेल. शिवाय आतापर्यंत झालेल्या सर्व अकरा दिवसरात्र कसोटी सामन्यांचा निकाल लागला आहे. हिंदुस्थानच्या तुलनेत बांगलादेशचा संघ खूप कमकुवत असल्याने बाराव्या दिवसरात्र कसोटीचाही निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी सोयीची वेळ

हिंदुस्थानबांगलादेशदरम्यान होणारा हा दिवसरात्र कसोटी सामन्याची वेळ दुपारी 1.30 ते रात्री 8.30 अशी असेल. प्रेक्षकांना लवकर घरी जाण्यासाठी आम्ही ही सोयीची वेळ ठेवली आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी सांगितले. या सोयीच्या वेळेमुळेच देशातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या ईडन गार्डन मैदानाची तिकिटे हाऊसफुल झाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या