संगमेश्वरात डिंगणीत आढळला बिबट्याचा मृत बछडा; वन विभागामार्फत तपास सुरू

संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी चाळकेवाडी येथे शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला आहे. याबाबत पोलीस पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर संगमेश्वर येथील वनपालांनी घटनास्थाळी जात पाहाणी केली.

वनक्षेत्रपालांनी पंचासोबत घटनास्थळी पंचनामा केला. मृत बिबट्याचा बछडा अंदाजे तीन ते चार महिन्याची मादी आहे. मानेवर दाताच्या खोल खुणा दिसून आल्या आहेत. तसेच जखमेतून रक्त बाहेर आल्याचे दिसून आले आहे. पायाच्या वरील बाजूस जखम असल्याचे आढळले. मृत बछड्याचा पंचनामा करत वनविभागाने शव ताब्यात घेतले आहे. त्यानंतर देवरूख येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे बछड्याचे शवविच्छेदन केले. वन्यप्राण्याच्या हल्यात जखमी झाल्याने बिबट्याच्या बछड्यचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बिबट्याच्या छाव्याचा मृत्यूबाबतचा अधिक तपास विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) अ.का. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्त वनपाल संगमेश्वर, वनरक्षक, कडुकर व वनरक्षक कराडे हे करत आहेत. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्यासाठी वनविभागाचा टोल फ्री क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक बोराटे यांनी केले आहे.