
कोरोनाच्या दुसऱया लाटेत जिल्ह्यात जवळपास दीड ते दोन महिन्यांचा लॉकडाऊन होता. या काळात शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुराच्या हाताला काम नव्हते. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी भांडवल उभे करून देण्यासाठी जिल्हा सहकारी बँक शेतकऱयांच्या पाठिशी ठाम राहिली. जिल्हा बँकेने 66 टक्के वसुली करत नव्याने बळीराजाला 1 हजार 07 कोटी रुपयांचे पीककर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर उर्वरित शासकीय, खासगी आणि अन्य बँकांनी शेतकऱयांना हंगामासाठी 156 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
मान्सून पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी लावली आहे, तर मान्सूनदेखील उंबरठय़ावर असल्याने जिल्ह्यात बळीराजाने खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. हंगामासाठी खते, बियाणे, किटकनाशकांसोबत शेतकऱयांना खेळत्या भांडवलाची गरज असते. कोरोनामुळे शहरी भागासह ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा वेग मंदावला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱयांना खरिपासाठी कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 3 हजार 753 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यात जिल्हा बँक, सरकारी बँक, खासगी बँका आणि ग्रामीण बँकांना कर्जाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. मात्र, जिल्हा बँक वगळता अन्य बँका शेतकऱयांच्या कर्जाबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. ते जिल्हा अग्रणीय बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 172 कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप झालेले असून,
यात एकटय़ा जिल्हा बँकेचा वाटा 1 हजार 07 कोटी रुपयांचा आहे. उर्वरित सर्व बँकांनी अवघ्या 156 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य शेतकऱयांना उपलब्ध करून दिले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले.
खरीप हंगामाच्या कर्जवाटपाचा कालावधी हा सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे. साधारण एप्रिल, मे पासून खरिपासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात होते. मात्र, बागायत तालुक्यात प्रामुख्याने ऊसलागवडीसाठी कर्ज घेण्यात येते. ही लागवड उशिरा सुरू होत असल्याने सध्या ज्या तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक आहे, तेथे जिल्हा बँकेचे कर्ज सध्या कमी दिसत आहे. मात्र, पावसाच्या पाण्यावर पिके घेणाऱया तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या पतपुरवठय़ाचा आकडा अधिक असल्याचे दिसते.
तालुकानिहाय पतपुरवठा
(आकडे कोटींमध्ये)
अकोले 107 कोटी, संगमनेर 121, श्रीरामपूर 13, नगर 143, जामखेड 77, कर्जत 82, कोपरगाव 18, नेवासा 23, शेवगाव 43, श्रीगोंदा 40, पारनेर 176, पाथर्डी 112, राहुरी 28, राहाता 13 कोटी.




























































