
सामना प्रतिनिधी । लोहारा
धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१७ च्या हंगामातील सोयाबीन पिक विम्याबाबत एक आठवड्यात निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१७ मधील सोयाबीन पिकाचा विमा हा विमा वंâपनीच्या वतीने नाकारण्यात आला आहे. यामुळे धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. वास्तविक पाहता खरीप २०१७ मध्ये पावसाने तब्बल ५० दिवस उघडीप दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी उमरगा – लोहाऱ्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले व धाराशिवचे राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासनाकडे मोठा पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विमा कंपनीकडून केलेल्या पंचनाम्यात असलेल्या असंख्य त्रुटी आहेत, पेरणी क्षेत्र ५ हजार हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या मंडळात तालुका घटक न धरता मंडळनिहाय घटक धारणेबाबतचे सांख्यिकी विभागाचे निकष डावलण्यात आल्याचे तसेच पीकविमा कंपनीने संकेतस्थळावर जाहीर केलेली रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणारी रक्कम यात असलेली तफावत मंत्रीमहोदयाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कोणत्याही परिस्थिती धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१७ मधील सोयाबीनचा पिक विमा देण्याबाबत आग्रही मागणी केली.
सदर बैठकीत मंत्रिमहोदयांनी उपस्थित सन्मानीय विधिमंडळातील सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांचे म्हणणे एकूण घेऊन सदर प्रकरणी एक आठवड्याचा आत निर्णय देण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार संगीताताई ठोंबरे, कृषी आयुक्त व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.






























































