
काही वर्षांपूर्वी स्मार्टवाॅच हा आपल्या लाइफस्टाइलचा एक अविभाज्य भाग होता. प्रत्येकजण हातामध्ये स्मार्टवाॅच घातलेला दिसायचा. ऑफिसपासून ते जिमपर्यंत, प्रत्येकजण स्मार्टवॉचचा वापर करताना दिसत होता. स्मार्टवॉचमुळे तुम्हाला कोणी कॉल केला किंवा मेसेज पाठवला हे कळू शकते. स्मार्टवॉचवर तुमच्या हृदयाचे ठोकेसुद्धा पाहिले जाऊ शकतात. पण आता, असे दिसते की लोकांना स्मार्टवॉचचा कंटाळा येऊ लागला आहे. स्मार्टवॉचऐवजी, लोक साध्या घड्याळांकडे वळत आहेत. स्मार्टवॉचची क्रेझ आता कमी होतेय का? अनेक रिपोर्ट्स आणि बाजारातील ट्रेंड पाहता तसं चित्र दिसत आहे. काही वर्षांपूर्वी जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टवॉच दिसायची, पण आता लोक पुन्हा साध्या आणि पारंपरिक घड्याळांकडे वळताना दिसत आहेत.
यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स. स्मार्टवॉचमुळे लोक कायम मोबाईलशी जोडलेले राहतात. अनेकांना आता फोनपासून थोडं दूर राहायचं आहे, पण घड्याळामुळे वारंवार लक्ष मोबाईलकडे जातं. त्यामुळे काही लोक स्मार्टवॉच वापरणं कमी करत आहेत. असे वृत्त एबीपीने दिले आहे. दुसरं कारण म्हणजे खर्च. स्मार्टफोनप्रमाणेच स्मार्टवॉचही 2 ते 3 वर्षांत जुनी वाटू लागतात. नवीन फीचर्स आणि अपडेट्समुळे लोकांना पुन्हा नवीन घड्याळ घ्यावं लागतं. हा खर्च अनेकांना आता नकोसा वाटू लागला आहे. डिझाइनचाही मोठा प्रभाव आहे. स्मार्टवॉच आधुनिक दिसत असल्या तरी क्लासिक आणि स्टायलिश पारंपरिक घड्याळं लोकांना जास्त आवडू लागली आहेत. विशेषतः तरुणांमध्ये विंटेज आणि प्रीमियम लुकच्या घड्याळांची पुन्हा फॅशन वाढताना दिसते आहे.
याशिवाय, स्मार्टवॉचमधील अनेक फीचर्स आता मोबाईलमध्येच मिळतात. स्टेप काउंट, फिटनेस ट्रॅकिंग आणि नोटिफिकेशन्ससारख्या सुविधा फोनमध्ये सहज उपलब्ध असल्याने वेगळी स्मार्टवॉच घेण्याची गरज अनेकांना वाटत नाही. हिंदुस्थाामध्ये स्मार्टवॉच विक्रीत घट झाल्याचं काही रिपोर्ट्समध्ये सांगितलं आहे. कमी किमतीच्या स्मार्टवॉचमध्ये लोकांचा रस कमी होताना दिसतो आहे. कारण अनेक कंपन्या जवळपास सारखीच उत्पादने बाजारात आणत आहेत. काही संशोधनांमध्ये स्मार्टवॉचने दाखवलेला हेल्थ डेटा पूर्णपणे अचूक नसल्याचंही समोर आलं आहे. फिटनेस आणि कॅलरी ट्रॅकिंगमध्ये चुका होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने लोकांचा विश्वास काही प्रमाणात कमी झाला आहे.





























































