महानंदकडून दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची कपात, दुधाचा पुरवठा वाढल्याने निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार महिन्यांपासून घटलेल्या दुधाच्या पुरवठय़ात सकारात्मक वाढ झाल्याने महानंद डेअरीने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधाला 35 रुपये दर दिला जात होता. तो आता दोन रुपयांनी कमी करत 33 रुपये केला आहे.

महानंद डेअरीकडून दररोज दीड लाख लिटर पिशवीबंद दुधाचे वितरण केले जाते. सदरचे दूध महानंद डेअरी आपल्या तालुका आणि जिल्हा स्तरावरील सहकारी दूध संघांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी करते. त्यासाठी फेब्रुवारीपासून प्रतिलिटर दुधाला 35 रुपये एवढा दर दिला जात होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरीची मागणी कमी झाल्याने खासगी दूध संघांकडून होणारी दुधाची पळवापळवी थांबली आहे. त्यामुळे जिल्हा आणि तालुका दूध संघांकडे होणारे दुधाचे संकलन वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर महानंदने दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली आहे.

आणखी एक रुपया कमी होणार

महानंद डेअरीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत पुढील आठवडय़ात दुधाचा पुरवठा पाहून आणखी एक रुपयाने खरेदी दरकपात करण्याबाबत चर्चा झाल्याचे महानंदच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.