
मुंबई शहर आणि उपनगरात 29 हजारहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था असल्या तरी जवळपास निम्म्या संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्वेन्स) झालेले नाही. हौसिंग सोसायटय़ांच्या उदासीनतेमुळे वर्षाल केवळ 50-60 संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त संस्थांचे अभिहस्तांतरण व्हावे म्हणून सहकार विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
हौसिंग सोसायटय़ांचे मानीव अभिहस्तांतरण न झाल्याने मुंबईतील अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी येत आहेत. एखाद्या सहकारी हौसिंग सोसायटय़ांचे मानीव अभिहस्तांतरण झाले नसेल तर संस्थेचे सभासद केवळ सदनिकांचे मालक असतात, परंतु इमारतीची जागा मात्र मूळ मालकाच्या नावावर असते. त्यामुळे पुनर्विकास करताना जागा मालक आणि सदनिकाधारकांचे एकमत होत नसल्याने पुनर्विकास प्रकल्प रखडतात. त्यामुळे संबंधित सदनिकाधारकांना किंवा सहकारी हौसिंग सोसायटय़ांनी एकत्रित येत आपल्या आपल्या संस्थेचे डिम्ड कन्वेन्स करून घ्यावे. त्यासाठी काय कागदपत्रांची अवश्यकता आहे. तसेच डिम्ड कन्वेन्स करणे का गरजेचे आहे याची माहिती देण्यासाठी सहकार विभागाकडून विभागनिहाय कार्यक्रम घेतले जात असल्याची माहिती सहकार विभागाच्या एका अधिकाऱयाने दिली.




























































