
मुंबईतील हाऊसिंग सोसायटय़ा आपल्या इमारतीची जागा सोसायटीच्या नावावर करून घेण्याबाबत म्हणजे मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) करून घेण्याबाबत उदासीन असल्याचे समोर आले आहे. सहकारी विभागाने 1 जानेवारीपासून महिनाभर मानीव अभिहस्तांतरण मोहीम राबवली आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातील चार जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडे केवळ 152 हाऊसिंग सोसायटय़ांनी डिम्ड कन्व्हेन्सबाबतचे प्रस्ताव पाठवले आहेत. यावरून सोसायटय़ा आणि त्यांच्या सभासदांची उदासीनता दिसून येत आहे.
मुंबईत जवळपास 28 हजार सहकारी हाऊसिंग सोसायटय़ा आहेत. विकासकाने इमारतीमधील सदनिका विकल्यानंतर सभासद एकत्र येत सहकार कायद्यानुसार हाऊसिंग सोसायटीची नोंदणी करून कारभार करतात. मात्र आजही मुंबईत असलेल्या एपूण सहकारी हाऊसिंग सोसायटय़ांपैकी 60 टक्के सोसायटय़ांच्या इमारतींची जागा संस्थांच्या नावावर नाहीत. अनेक ठिकाणी विकासक जागा नावावर करून देण्याबाबत टाळाटाळ करतात. त्यामुळे रहिवाशांना नेहमीच जागा मालकाच्या मनमानीचा सामना करावा लागतो. इमारतीचा पुनर्विकास करतानाही जागा मालक रहिवाशांची लूट करतात. त्यापार्श्वभूमीवर सरकारने मानीव अभिहस्तांतरण कायद्यानुसार इमारतीच्या जागेची मालकी हाऊसिंग सोसायटीला देण्याचा निर्णय याआधीच घेतलेला आहे. याचा जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायटय़ांनी लाभ घ्यावा म्हणून सहकार विभागाने 1 ते 31 जानेवारी या कालावधीत मानीव अभिहस्तांतरण मोहीम राबवली आहे. त्यानुसार मुंबईतील चारही जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडे केवळ 152 अर्ज आले असल्याची माहिती सहकार विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
चार महिन्यांत मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होणार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडे आलेल्या प्रस्तावांची प्रथम छाननी करून त्याबाबतची नोटीस जागा मालक आणि सोसायटीला पाठवली जाते. त्यानंतर कायदेशीर सुनावणीमध्ये सोसायटी आणि जागा मालकाची बाजू ऐपून घेतल्यानंतर जागेचे मानीव अभिहस्तांतरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांनी संगितले.






























































