इतिहास घडला! हिंदुस्थानी गोलंदाजांची 2019 मध्ये हॅटट्रीकची ‘हॅटट्रीक’

1474

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने बांगलादेशविरुद्ध निर्णायक लढतीत 7 धावांमध्ये 6 बळी घेतले. या दरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली हॅटट्रीकही मिळवली. हा सामना टीम इंडियाने 30 धावा राखून आरामात जिंकला आणि मालिका 2-1 अशी खिशात घातली. धारधार गोलंदाजी करणाऱ्या चहरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

तीन दिवसात दोनदा हॅटट्रीक, चहरचा टी-20मध्ये आगळावेगळा विक्रम

बांगलादेशविरुद्ध हॅटट्रीक मिळवताच चहर आणि टीम इंडियाच्या नावावर अनोखा विक्रम जमा झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून पहिली हॅटट्रीक घेण्याचा मान चहरला मिळवला. 2019 मध्ये हिंदुस्थानकडून हॅटट्रीक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. यासह एकाच कॅलेंडर इअरमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये हॅटट्रीक घेण्याचा दुर्मिळ विक्रमाची नोंद टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. याचाच अर्थ टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हॅटट्रीकची ‘हॅटट्रीक’ साधली आहे. असा विक्रम जगातील कोणत्याही देशाला जमलेला नाही.

शमीचा दणका
मोहम्मद शमीने याच वर्षी इंग्लंडमध्य़े खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपमध्ये अफगानिस्तानविरुद्ध हॅटट्रीकची नोंद केली होती. शमीने डावाच्या अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना मोहम्मद नबी (52), आफताम आलम (0) आणि मुजीब उर रहमान (0) या तिघांना सलगच्या चेंडूवर बाद केले होते.

बुम-बुम बुमराह
बुमराहने सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सबिना पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी लढतीत लागोपाठच्या तीन चेंडूवर तीन फलंदाजांना बाद करत हॅटट्रीक साधली होती. बुमराहने डावाच्या नवव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्हो (4), तिसऱ्या चेंडूवर शाहमार ब्रुक्स (0) आणि चौथ्या चेंडूवर रोस्टन चेज (0) याला माघारी धाडले.

चहरचा कहर
बांगलादेशविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या लढतीत डावाच्या 18 व्या षटकात चहरने अखेरच्या चेंडूवर शफीकूर इस्लाम याला बाद केले. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुस्तफिजूर रहमान याला आणि दुसऱ्या चेंडूवर अमीनूल इस्लाम याला बोल्ड करत हॅटट्रीक पूर्ण केली.

आपली प्रतिक्रिया द्या