तीन दिवसात दोनदा हॅटट्रीक, चहरचा टी-20मध्ये आगळावेगळा विक्रम

5269

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने टी-20 क्रिकेटमध्ये तीन दिवसात दोनदा हॅटट्रीक घेत आगळावेगळा विक्रम केला आहे. मंगळवारी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत राजस्थान आणि विदर्भाच्या सामन्यात चहरने हॅटट्रीकची नोंद केली. तत्पूर्वी नागपूरमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 लढतीतही त्याने हॅटट्रीक घेतली होती. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा पहिला खेळाडू म्हणून चहरच्या नावाची नोंद झाली.

तिरुवनंतपूरम येथे खेळल्या गेल्या लढतीत दीपक चहरने हॅटट्रीकची नोंद केली. 27 वर्षीय चहरने राजस्थानकडून खेळताना विदर्भाच्या तीन खेळाडूंना सगलच्या चेंडूवर बाद केले. या लढतीत त्याने एकूण चार बळी घेतले. 13 षटकांच्या झालेल्या या लढतीत चहरने 3 षटकांची गोलंदाजी केली आणि 18 धावा देत चार बळी घेतले. विशेष म्हणजे या लढतीत चहरने एकाच षटकात चार खेळाडू बाद केले.

दीपक चहर आपल्या अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऋषभ राठोड याची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दर्शन नालकंडे, पाचव्या चेंडूवर श्रीकांत वाघ आणि सहाव्या चेंडूवर अक्षय वाडकर यांची विकेट घेत हॅटट्रीक साधली. चहरच्या या धारधार गोलंदाजीच्या बळावर विदर्भाचा संघ फक्त 99 धावा करू शकला. यानंतर डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार राजस्थानपुढे 106 धावांचे आव्हान ठेवले. राजस्थानचा संघ निर्धारित षटकात 8 बाद 105 धावा करू शकला आणि अवघ्या एका धावेने त्यांनी हा सामना गमावला.

नागपूरमध्ये पहिली हॅटट्रीक
नागपूरमध्ये झालेल्या अंतिम टी-20 लढतीत दीपक चहरने तुफानी कामगिरी केली. या सामन्यात त्याने 3.2 षटकांची गोलंदाजी केली आणि 7 धावा देत 6 बळी मिळवले. यात त्याच्या हॅटट्रीकचाही समावेश आहे. दीपकच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने सामना आणि मालिकाही नावावर केली.

आपली प्रतिक्रिया द्या