
सामना प्रतिनिधी । मालवण
चिपी विमानतळावर उतरलेल्या पहिल्या विमानातून बाप्पांचे आगमन झाले. दुसर्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आगमन झाले. आता तिसरे विमान रिकामे येईल. कारण त्यातून जिल्ह्यातील अपप्रवृत्ती, दहशत पसरविणार्या तिघांचे पार्सल मुंबईला पाठविले जाणार आहे. असे सांगत गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मालवण येथील हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, “जिल्हा परिषदेच्यावतीने शासकीय योजनांचा गैरवापर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष करत आहे. याची माहिती उपलब्ध झाली आहे. शासकीय योजना या गोरगरीब जनतेसाठी असतात मात्र त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने स्वाभिमान पक्षाकडून होत आहे. केंद्रात, राज्यात युतीची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेला दिला जाणारा निधी हा युती शासनाचा आहे. असे असताना या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्वाभीमान पक्षाकडून केला जात आहे. सर्वसामान्य महिलांची फसवणूकही त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पारंपरिक मच्छीमारांच्या जिवावर उठलेली एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करण्यास आम्ही हायस्पीड गस्तीनौका घेण्याची कार्यवाही केली आहे. गस्तीनौका संयुक्त गस्त करून परप्रांतीय, एलईडीच्या बोटी पकडून किनार्यावर आणणार आहेत. वाळूच्या बोटी पकडल्यानंतर होणार्या कारवाईसारखीच एलईडीच्या बोटींवर कारवाई व्हावी यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर यावर अंतिम कार्यवाही होईल. एलईडी आणि पर्ससीन या बोटी स्वाभिमानच्याच कार्यकर्त्यांच्या आहेत, यामुळे स्वाभिमानबद्दल मच्छीमारांच्या मनात कसलीही सहकार्याची भूमिका नाही. फक्त चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात असून मच्छीमारांना भडकविण्याचे काम स्वाभिमानकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतीच
कोकणातील एकाही नेत्याची संपत्ती निवडणूक आल्यानंतर वाढली नाही. मात्र विरोधकांची संपत्ती मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संपत्ती कशी वाढली हे जनतेला ठाऊक आहे. जिल्ह्यातील दहशत संपविण्यासाठीच शिवसेना-भाजप खंबीरपणे लढत आहे. यामुळे मुंबईतील पार्सलांना आता परत पाठविण्याची वेळ आली आहे. त्यांची बेताल बडबड जिल्हा बँक, जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकाविल्यावर शांत होईल. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत युतीचाच झेंडा पुन्हा डौलाने फडकत राहील असा विश्वासही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.




























































