
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांना तडकाफडकी पदमुक्त का करण्यात आले, असा जाब विचारत संतप्त कोल्हापूरकरांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात घेराव घालून चांगलेच धारेवर धरले. श्री अंबाबाई मंदिराबाबत कोणाचाही राजकीय दबाव खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आला, तर ही कारवाई करण्यास कोणाचा दबाव होता, यामागचा सूत्रधार कोण, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना करण्यात आले. अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन केल्यानंतरही पुन्हा झीज होत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे सचिवांना पदमुक्त करण्यात आले.