
विजय जोशी । नांदेड
बारा वर्षांपासून ऊन पाऊसाची तमा न बाळगता नरेंद्र मोदींसाठी अनवाणी फिरणारे भाजपचे कट्टर कार्यकर्ते दीपकसिंह ठाकूर यांची नगर येथे मोदींसोबत प्रत्यक्ष भेट झाली. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदी पुन्हा निवड झाल्यानंतरच चप्पल घालण्याचा निर्धार दीपकसिंह ठाकूर यांनी केला आहे.
मोदीभक्त चाय वाला म्हणून सर्वपरिचित असलेले दीपकसिंह ठाकूर यांची माहिती त्यांचे मोठे बंधू धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी मोदींना नांदेडला आल्यानंतर दिली होती. पंतप्रधानांनी होकार देऊनही औसा येथे दीपकसिंह यांची भेट होऊ शकली नव्हती. मात्र नगर येथे जाहीर सभा झाल्यानंतर त्यांची मोदींशी प्रत्यक्ष भेट झाली. मोदी यांनी दीपकसिंह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर चौकशी केली. अनवाणी फिरू नका असा वडीलकीचा सल्लाही दिला. दीपकसिंह यांनी चप्पल घालण्याचे मान्य केले. परंतु सोशल मीडियावर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतरच दीपकसिंह चप्पल घालणार असल्याचे वायरल झाले. बारा वर्षात आणखी एक महिन्याची भर पडल्याने काही फरक पडणार नाही असा विचार करून दीपकसिंह यांनी अनवाणी फिरण्याचे व्रत सुरूच ठेवले आहे. मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतरच त्यांची जुनी चप्पल घालूनच आपण चप्पल घालण्याची सुरुवात करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मोदी यांची भेट होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच त्यांनी आभार मानले.

























































